माळशिरस व अकलूज खाजगी हॉस्पिटल विरोधात मुंबई विधानभवनात हक्कभंग प्रस्ताव सादर होणार…

अनाधिकृतपणे शस्त्रक्रिया व वैद्यकीय हलगर्जीपणा करून माझ्या पत्नीचा मृत्यू घडवून आणणाऱ्यांची चौकशी करून परवाना रद्द करून कार्यवाही करावी – रामदास साबळे
माळशिरस (बारामती झटका)
आई हॉस्पिटल माळशिरस व हेगडे हॉस्पिटल अकलूज या खाजगी हॉस्पिटलमध्ये अनाधिकृतपणे शस्त्रक्रिया व वैद्यकीय हलगर्जीपणा करून सुनिता रामदास साबळे माझ्या पत्नीचा मृत्यू घडवून आणणाऱ्यांची चौकशी करून परवाना रद्द करून कार्यवाही व्हावी, यासाठी श्री. रामदास किसन साबळे, व्यवसाय शिक्षक, रा. ब्रह्मचैतन्यनगर, माळशिरस यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अकलूज, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माळशिरस, वैद्यकीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे रीतसर तक्रारी अर्ज केलेला असून सदर अर्जासोबत मयत खबर तारीख 13/9/2026 अर्जदाराचे आधार कार्ड, हॉस्पिटल बिल कागदपत्रे अशी सर्व जोडून जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांनाही पाठविण्यात आलेले आहे. सदर तक्रारीची दखल घेऊन आदिवासी समाजाचे नेते नरहरी झिरवळ विधानभवनात हक्कभंग प्रस्ताव सादर होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले…
श्री. रामदास किसन साबळे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये अत्यंत गंभीर तक्रार दिली आहे. त्यामध्ये, माझी पत्नी सुनिता हिला अपत्य नसल्याने आम्ही दोन महिन्यापासून आई हॉस्पिटल माळशिरस येथे डॉक्टर सागर कोळेकर यांच्याकडे उपचार घेत होतो. तारीख 10/09/2026 रोजी दोन्ही ट्यूब बंद असल्याने दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करावे लागेल व त्यासाठी अकलूज येथून डॉक्टर येणार आहेत असे सांगितले. दि. 12/09/2026 रोजी साडेनऊ वाजता माझ्या पत्नीला ऍडमिट केले. दुपारी बारा वाजता ऑपरेशन थेटर मध्ये नेले. साडेबारा वाजता ऑक्सिजन लेवल कमी झाल्याचे सांगितले व दुपारी चार वाजेपर्यंत तेथेच ठेवून नंतर ॲम्बुलन्सने हेगडे हॉस्पिटल अकलूज येथे हलविले. तेथे सायंकाळी साडेसात वाजता तिचा मृत्यू झाला.

तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये
अ) बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन.. आई हॉस्पिटल माळशिरस हे लहान खाजगी हॉस्पिटल असून तेथे मेजर ऑपरेशन (Laparoscopy Under general Anesthesia) करण्याची परवानगी सुविधा, आयसीयू, भुलतज्ञ, ऑक्सिजन इमर्जन्सी, औषधे आहेत का, याची तपासणी करावी,
ब) अनाधिकृत डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया.
माझ्या पत्नीवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण होते, त्यांचे नाव मला सांगितले नाही, अकलूज येथून डॉक्टर येणार असे सांगितले. बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांचे नाव OT रजिस्टरला आहे का ते MMC रजिस्टर डॉक्टर आहेत का ?
क) भूलतज्ञांची अनुपस्थिती
कोणत्याही दुर्बिणीच्या ऑपरेशनला MD Anesthesia असणे बंधनकारक आहे. त्या दिवशी भुलतज्ञ कोण होता, त्याची सही Anesthesia रेकॉर्डवर आहे का.
ड) रुग्णांचा जीव धोक्यात घालणे.
फिट व ऑक्सिजन कमी झाल्यानंतर ही अडीच तास त्याच हॉस्पिटल मध्ये ठेवणे हा निष्काळजीपणा आहे, तात्काळ मोठ्या हॉस्पिटलमध्ये का हलवले नाही.
अशा मुद्द्यांची तक्रार असून आपणास विनंती आहे की आपण तात्काळ खालील कारवाई करावी.






१)आपण स्वतः दोन्ही हॉस्पिटल ला भेट देऊन बॉम्बे नरसिंग होम ॲक्ट अंतर्गत नोंदणी परवाना ,OT ची पाहणी, स्टाफ ,औषध साठा, बायोमेडिकल वेस्ट परवाना तपासावा.
२) तारीख 10/9/2026 रोजी चे OT Register, IPD Register Anesthesia Register केस पेपर जप्त करून आपल्या ताब्यात घ्यावेत.
३) त्यादिवशी उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टर नर्स भूलतज्ञ यांचे जबाब नोंदवावेत,
४) सदर हॉस्पिटल चा ऑपरेशन करण्याचा परवाना तात्पुरता रद्द करून हॉस्पिटल शील करण्याची शिफारस जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांना करावी.
५) आपला सविस्तर चौकशी अहवाल अकलूज पोलीस स्टेशन व मला द्यावा जेणेकरून मी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई येथे दादमागू शकेन.
सदर प्रकरण हे केवळ माझ्या पत्नीपुरते नसून माळशिरस तालुक्यातील इतर गोरगरीब रुग्णांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे अशा बोगस हॉस्पिटल मुळे आणखी बळी जाऊ नये म्हणून आपण कठोर कार्यवाही करावी अशी लेखी स्वरुपात तक्रार दिलेली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



