माळशिरस नगर विकास आघाडीचा आदर्श ग्रामपंचायत पाटोद्याकडे विकास अभ्यास दौरा

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून माळशिरस नगर विकास आघाडीच्या वतीने एका विशेष विकास अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा राज्यातील नव्हे तर देशातील पहिली आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावाजलेल्या ग्रामपंचायत पाटोदा, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी हा दौरा संपन्न होणार आहे. “आदर्श विकासाचा अभ्यास, प्रगत माळशिरसचा संकल्प!” हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. याबाबत अधिक माहिती देताना नगरसेविका ॲड. रेश्माताई टेळे यांनी सांगितले की, “पाटोदा ग्रामपंचायतीने स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा, शेतीपूरक विकास आणि ई-प्रशासन या क्षेत्रात केलेले काम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे. माळशिरसचा विकास करताना पाटोदा पॅटर्न राबवता येईल का, याचा अभ्यास करणे हा या दौऱ्याचा हेतू आहे.”

या दौऱ्यात पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांशी थेट संवाद साधून तेथील विकास मॉडेल समजून घेतले जाणार आहे. तसेच तेथील जलसंधारणाचे प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालयाची कार्यपद्धती यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे माळशिरससाठी एक स्वतंत्र विकास आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात माळशिरस नगर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



