एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा उत्साहात साजरा

पंढरपूर (बारामती झटका)
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाखरीतील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी शिवसेना छत्रपतींच्या कार्याचा व विचारांचा आदर्श पुढे ठेवून आजच्या पिढीने आपल्या आचरणात उतरवणे हीच महाराजांना खरी मानवंदना ठरेल, असे विचार व्यक्त केले. स्वराज्य, शौर्य, निष्ठा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारे छत्रपतींचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध कला-गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा’ या नाटिकेतून छत्रपतींचे पराक्रम, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे उलगडण्यात आले. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली.
यानंतर छत्रपतींच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या पराक्रमावर आधारित शिवपोवाडा, दमदार शिवगर्जना तसेच भाषणांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने वातावरण भारावून टाकले. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कला, संगीत, मराठी व पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

शिवचरित्रातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व नागरिकत्वाची भावना जागृत करणारा एमआयटी विश्वशांती गुरुकुलचा हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



