मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस येथे कामबंद आंदोलन…

गटविकास अधिकारी विनायक गुळवे निषेध नोंदवत काम बंद आंदोलनात झाले सहभागी…
माळशिरस (बारामती झटका)
जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीत धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती व्हावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये येऊन प्रचंड असा धुडगूस घातला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये अनेक खुर्च्या मोडल्या आहेत, खिडक्याच्या काचा फोडल्या आहेत.


या अचानक झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील प्रकारानंतर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पाचच्या सुमारास सर्व जिल्हा परिषद बंद करून यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू असलेली जिल्ह्याची आढावा मीटिंग थांबवून सर्व विभाग प्रमुख खाली आले.


यावेळी सीईओ आव्हाळे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येऊन, हा हल्ला म्हणजे आमच्या कुटुंबप्रमुखाच्या थेट खुर्चीवर हल्ला आहे. यापुढे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अशी कोणतीही घटना घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्हा परिषदेमध्ये गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा अकरा पंचायत समित्या उघडणार नाहीत असा इशारा देण्यात आला.
दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng