मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत महापालिका, झेडपी शिलेदारांचा उद्या सोलापुरात विजयी मेळावा

सोलापूर (बारामती झटका)
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्याबद्दल भाजपच्या सर्वच विजयी शिलेदारांचा मेळावा मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मंगळवारी बार्शी येथील श्री भगवंत महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी रविवारी हेरिटेज येथे पालकमंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. फडणवीस यांच्या या दौऱ्यातच सोलापुरातही मेळावा घेऊन विजयी शिलेदारांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. या बैठकीला विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे हे आमदार, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक हे माजी आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद गटाच्या रश्मी बागल, महापालिकेचे गटनेते नरेंद्र काळे, सभापती चेतनसिंह केदार-सावंत, शहाजी पवार, रणवीर राऊत, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, भाजपचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये व्यासपीठ उभारणी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा यंत्रणा, तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जनतेचा आभार मेळावा
जिल्ह्यातील ११ पैकी १० नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला शहर-जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून यश दिले. शहर आणि जिल्ह्याची एकहाती सत्ता दिली. ३० वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या ताकदीवर न भुतो न भविष्यती, असे यश मिळविले आहे. या यशामुळे जिल्ह्यात ११ पंचायत समित्यांपैकी १० पंचायत समित्यांवर भाजपचा सभापती, जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोलापूर महापालिकेत महापौर व उपमहापौर व काही विशेष समिती सभापतिपदी पदाधिकारी विराजमान झाले आहेत. एवढे मोठे यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आणि खासकरून निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करावे व त्यांचा सत्कार करावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापुरात येत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. यावरून निवडणुकीमध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून येत आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



