ताज्या बातम्यासामाजिक

नागपूर रेल्वे स्थानकावर 3.90 किलो अमली पदार्थ जप्त; एक व्यक्ती ताब्यात

नागपूर (बारामती झटका)

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नागपूर रेल्वे स्थानकावर एक महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.
दि. 26.04.2026 रोजी अपराध गुप्तचर शाखा, नागपूर यांच्या निर्देशानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 (मुंबई बाजू) येथे देखरेख ड्युटी दरम्यान एका संशयित व्यक्तीस थांबविण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव मोहित सिंदूर, रा. जिल्हा बालंगीर (ओडिशा) असे सांगितले.

संशयाच्या आधारे त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या पाठीच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये खाकी टेपने गुंडाळलेले एकूण चार पॅकेट आढळून आले. डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तपासणी केली असता अमली पदार्थ असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत नियमानुसार पॅकेट्सची तपासणी व वजन करण्यात आले.

तपासणीत एकूण सुमारे 3.90 किलो अमली पदार्थ (गांजा सदृश) जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत रू. 78,000 इतकी आहे.

संपूर्ण कारवाईची छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करून जप्तीची प्रक्रिया विधिवत पूर्ण करण्यात आली.
सदर व्यक्तीस जप्त केलेल्या अमली पदार्थासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

मध्य रेल्वे, नागपूर विभाग प्रवाशांची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button