नाना पाटेकर नुसते चित्रपट अभिनेते नव्हते तर, एक अत्यंत संवेदनशील सामाजिक कार्यकर्तेही…

पुणे (बारामती झटका)
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री. नाना पाटेकर यांचे निधनाचे धक्कादायक वृत्त सकाळीच समजले. अत्यंत दुःख झाले. सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
नाना पाटेकर नुसते चित्रपट अभिनेते नव्हते तर एक अत्यंत संवेदनशील सामाजिक कार्यकर्तेही होते. या निमित्त त्यांच्याबद्दलची एक आठवण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोष्ट खूप जुनी आहे. साधारणपणे 38 वर्षांपूर्वीची. माझ्या आठवणी प्रमाणे 1988 साली केंद्रशासनाने संपूर्ण देशात व राज्यात राष्ट्रीय साक्षरता अभियान कार्यक्रमांतर्गत अगदी मोठ्या शहरातील झोपडपट्ट्या पासून ते छोट्या गावातील अगदी वाड्या वस्तीतील निरक्षर लोकांना दोन टप्प्यात साक्षर करण्याचा अत्यंत महत्त्वकांक्षी कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवला होता. त्यावेळी मी पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात 1980 ते 1995 दरम्यान प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून काम करत होतो.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय साक्षरता अभियान कार्यक्रम राबवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी माननीय श्री. गोविंदभाई श्राफ त्यांच्यावर सोपवली होती. तर औरंगाबाद जिल्हा राष्ट्रीय साक्षरता अभियान वातावरण निर्मिती प्रमुख म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख व वऱ्हाड निघाले लंडनला फेम डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यावर सोपवली होती आणि पैठण तालुका साक्षरता अभियान वातावरण निर्मिती प्रमुख म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली होती.
औरंगाबाद जिल्ह्यात साक्षरता अभियान वातावरण निर्मिती करण्यासाठी पथनाट्य, कीर्तन, भारुड, लघु नाटिका, गाणी, पोवाडे इत्यादींच्या माध्यमातून काम करायचे ठरले. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय साक्षरता अभियान तालुका वातावरण निर्मिती प्रमुख तसेच कीर्तनकार, भारूडकार, विद्यार्थी कलाकार यांना प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद येथे केंद्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे व त्याचे उद्घघाटनासाठी सिने अभिनेते नाना पाटेकर यांना निमंत्रित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधला व नाना पाटेकरांनीही निमंत्रण स्वीकारले. साक्षरता अभियान हे राष्ट्रीय व सामाजिक कार्य असल्याने मी यासाठी कोणतेही मानधन घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
साक्षरता अभियान प्रशिक्षण शिबिराच्या उद्घघाटनासाठी सिने अभिनेता नाना पाटेकर येणार असे समजल्यामुळे दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथे नव्यानेच बांधलेल्या एका सिनेमागृहाचे उद्घघाटनासाठी सिनेमागृहाच्या मालकाने त्यांना निमंत्रित केले. त्यासाठी सिनेमागृहाच्या मालकाने त्यांना रुपये चाळीस हजार एवढे मानधन दिले. परंतु नाना पाटेकर यांनी सदर रक्कम स्वतःकडे न ठेवता ती संपूर्ण रक्कम अत्यंत मोठ्या मनाने साक्षरता अभियान कार्यक्रमाला त्यांच्या तर्फे योगदान म्हणून दिली. त्याकाळी चाळीस हजार रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती.
एवढा मोठा आणि सुप्रसिद्ध अभिनेता असून सुद्धा मराठी व हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी सातत्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक बांधिलकी जपली. नाम फाउंडेशनच्या वतीने नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन प्रख्यात सिनेकलावंतांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना वेळोवेळी आर्थिक मदत केली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारण व जलसंवर्धनाची अनेक कामे करून शेतकऱ्यांना मदत केली हे आपल्या सर्वांनाच माहीतच आहे.
कोणाचीही तमा अथवा भीती न बाळगता अत्यंत परखडपणे आपले विचार मांडणारा एक सामाजिक कार्यकर्ता व उत्कृष्ट अभिनेता आज आपण गमावला आहे याचे दुःख सर्वांनाच आहे . त्यांना महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आपला,
प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, पुणे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



