पहिली पत्नी जिवंत असताना तिला मुल होऊ न देता दुसरा विवाह, पंढरपूर येथे गुन्हा दाखल!!

पंढरपूर (बारामती झटका)
पहिली पत्नी जिवंत असताना, पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसताना, पहिल्या पत्नीला अपत्य होऊ न देता, कायद्याला धाब्यावर बसवून बेकायदेशीर व अनधिकृत दुसरा विवाह केल्याची माहिती कळताच, पहिल्या पत्नीने पंढरपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथील पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष कै. पांडुरंग निवृत्ती शिंदे नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहन याचा विवाह, सोलापूर येथील फौजदार श्री. राजकुमार श्रीमान यांच्या मुलीबरोबर २०१७ साली झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची व अपत्यांची स्वप्ने दाखवून, पहिली पत्नी ऐश्वर्या हिला संपत्ती मिळू नये म्हणून, अपत्यप्राप्ती होऊ न देता, कट रचुन बेकायदेशीर व अनधिकृत दुसरा विवाह रोहन पांडुरंग शिंदे नाईक यांनी केला असल्याची गंभीर बाब उघड झाली असून, शिंदे नाईक कुटुंब हे कायद्याला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहन शिंदे नाईक यांचे बंधू राहुल शिंदे नाईक हे पंढरपूर नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक आहेत. शिंदे नाईक कुटुंब हे पंढरपूरात प्रतिष्ठित समजले जाते. अशा कुटुंबांतील सदस्यांनी कट रचुन, रोहनच्या पहिल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिला अंधारात ठेवून, बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पोपट तावरे यांच्या मुलीशी रोहनचा दुसरा विवाह हा बेकायदेशीरपणे व अनधिकृतपणे लावून, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याची फिर्याद, रोहन शिंदे नाईक यांची पहिली पत्नी ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक यांनी पंढरपूर पोलिसांत दाखल केली आहे.
घाईने व फसवणूक करून पहिला विवाह, माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा व मारहाण, पेट्रोलपंपाचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत म्हणून अपत्यप्राप्तीपासून वंचित ठेवणे, मारहाण करणे, मालमत्तेत वाटा दिला जाऊ नये म्हणून अपत्यप्राप्ती जाणूनबुजून होऊ न देणे, वाद करुन घटस्फोट प्रकरण दाखल करणे, पहिल्या पत्नीचा घटस्फोट प्रलंबित असताना बेकायदेशीर व अनधिकृत दुसरा विवाह करणे, दुसरा विवाह करुन गल्लीतील जगताप कुटुंबाला संपविल्याप्रमाणे तुला व तुझ्या माहेरच्या मंडळींना संपवू अशी पहिल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देणे, अशी अनेक गैरकृत्य कायद्याला धाब्यावर बसवून रोहन पांडुरंग शिंदे नाईक यांनी केली असल्याची फिर्याद ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक यांनी पंढरपूर पोलिसांत दिली आहे. याबाबत पंढरपूर पोलिस अद्याप तपास करत असुन, एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



