पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सज्ज; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

फलटण (बारामती झटका)
आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फलटण नगरपरिषदेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले.
या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, नगर अभियंता आर. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, नगरसेवक रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक अनुप शहा तसेच संबंधित कंत्राटदार प्रतिनिधी पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पालखी मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामांचा सविस्तर आढावा घेत अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पालखी आगमनापूर्वी जेवढे रस्ते उखडण्यात आले आहेत, ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पालखी सोहळा संपेपर्यंत शहरात कोणतेही नवीन रस्ते खोदू नयेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या व्यवस्थित आणि सुरक्षितरीत्या भरण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्त्यांची कामे सुरू असताना पाणीपुरवठा किंवा इतर पाईपलाईन फुटल्यास नगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदारांनी समन्वयातून त्वरित दुरुस्ती करावी, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

यावेळी पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना सुरू असलेल्या पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईपलाईनच्या कामांना प्राधान्य देऊन ती जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. शहराच्या विकासकामांमध्ये कोणी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्यास अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला.
नगराध्यक्षांनी दिलेल्या स्पष्ट आणि कडक निर्देशांमुळे पालखी मार्गावरील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



