संस्थेचे शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी धोरण राबवू – अशोक पवार

माळशिरस तालुका शिक्षक पथसंस्थेची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
वेळापूर (बारामती झटका)
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूजची ९६ वी सर्वसाधारण सभा इंद्रनील मंगल कार्यालय, वेळापूर येथे चेअरमन राजेंद्र उकिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२८) संपन्न झाली.
यावेळी संचालक मंडळांनी विषय पत्रिकेत मांडलेल्या मालमत्तेत वाढ करण्यासाठी जागा खरेदी करून व्यावसायिक दृष्टीने विकसन करणे, भाग भांडवल दुप्पट करणे, एसबीआय बँकेत संस्थेचे म्युच्युअल फंड खाते सुरू करणे, सदस्य सहायता निधी दुप्पट करणे यांसह विविध ठरावांना चर्चेअंती सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली.

राजेंद्र उकिरडे यांनी मनोगतातून सर्वांचे स्वागत केले तर अध्यक्ष अशोक पवार यांनी प्रस्ताविकातून मुदत ठेवीत ३८% वाढ, निव्वळ नफा दुपटीहून वाढून सुमारे ४८ लाख, ४७% कर्ज मर्यादा वाढ ११ लाखांपर्यंत, लग्नकार्यासाठी १ लाखाचे विशेष कर्ज, तातडीचे कर्ज ५०% वाढ, ३० हजार, संस्थेचे मोबाईल ॲप, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम यांचा आढावा घेतला.
सर्वसाधारण सभेत मांडलेल्या ठरावांवर सदस्य नितीन बनकर, विठ्ठल काळे, प्रदीप आवताडे आदींनी काही खुलासे करण्याची मागणी केली. त्यावेळी अध्यक्ष अशोक पवार, चेअरमन राजेंद्र उकिरडे यांच्यासह संचालकांनी समर्पक उत्तरे देऊन शाश्वत उत्पन्न वाढीसाठी मांडलेले ठराव कसे दूरगामी परिणाम घडवणारे आहेत हे विशद केले.
सभेच्या प्रारंभी उपक्रमशील शिक्षक धुंडीराज भिडे यांना संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. तर १५ शिक्षकांना शंकराव मोहिते पाटील गुणवंत पुरस्काराने ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदक प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सदरचा सन्मान सोहळा विविध शिक्षक संघटनांचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संचालक आप्पा खरात, विजय शिंदे, पांडुरंग मोहिते, अण्णासाहेब मगर, ज्ञानेश्वर मिसाळ, आत्माराम गायकवाड, अमोल नष्टे, प्रदीप अवताडे, लक्ष्मण वाघ, सचिन गाटे, दमयंती मांडवे, शामतवी मुल्ला आदी उपस्थित होते. चेअरमन राजेंद्र उकिरडे यांनी सर्वांचे स्वागत केले, तर व्हाईस चेअरमन रामचंद्र काटकर यांनी आभार प्रदर्शन केले. तर राजाराम गुजर आणि सुहास उरवणे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सतेज दिवटे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.
संस्थेचे शाश्वत उत्पन्न वाढविण्यासाठी सभासदांनी भरघोस पाठिंबा दिल्याने विरोधकांना विश्वासात घेऊन दूरगामी बदल घडविणारे धोरण अमलात आणले जाईल. – अशोक पवार, संचालक.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.