श्रीमती वंदना आईच्या कष्टाचे मोल करून मुलगी माधुरी महसूल सहाय्यक बनली, कांबळे घराण्याचं नाव सातासमुद्राकडे कोरले..

अकलूज (बारामती झटका)
प्रतिकूल परिस्थितीत आईने काबाडकष्ट करून मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. वंदना आईच्या कष्टाचे मोल करून मुलगी माधुरी महसूल सहाय्यक बनली. कांबळे घराण्याचं नाव सातासमुद्राकडे कोरलेले आहे.
बावडा, ता. इंदापूर येथे गौतम कांबळे, वंदना कांबळे यांना पुनम, माधुरी, या दोन मुली व योगेश मुलगा असे सुखी कुटुंब होते. गौतम कांबळे महाराष्ट्र परिवहन महामंडळ मध्ये कर्मचारी होते. अचानक त्यांच्या मृत्यूमुळे मातृत्व व पितृत्वाची जबाबदारी वंदना कांबळे यांच्यावर आलेली होती. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मुलांचे उदरनिर्वाह व शिक्षणाची जबाबदारी त्या माऊलीवर पडलेली होती. जिद्द, चिकाटी व मेहनत, शेतामध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं, यासाठी अहोरात्र मेहनत सुरू होती. मुलगा योगेश वडिलांच्या जागी एसटी महामंडळामध्ये लेखा अधिकारी पदावर रुजू झाला. मुलगी पुनम पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कामाला जाऊ लागली. आई वंदना स्वतःच्या रानामध्ये काबाडकष्ट करीत होत्या.
माधुरी हिला अधिकारी बनवायचे अशी खूणगाठ कांबळे परिवार यांनी बांधलेली होती. त्यासाठी माधुरीला अकलूज करिअर अकॅडमी येथे अभ्यासासाठी ठेवलेले होते. सदर ठिकाणी मित्रपरिवारांचे अभ्यासात योगदान लाभत असत. माधुरीने सुद्धा आपल्या आईच्या शेतातील काबाड कष्टाला नजरेसमोर ठेवून आपले भविष्य घडविण्यासाठी सतत अभ्यास केला. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आईच्या कष्टाचे मोल करून महसूल सहाय्यक बनलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व मित्र परिवारांच्या सहकार्यांमधून माधुरीच्या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



