उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या दुःखात माळशिरस शहर सहभागी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास विमान बारामती विमानतळावर उतरत असताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या दुःखात माळशिरस शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व व्यापारी दुःखात सहभागी झालेले असून माळशिरस शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार ठप्प ठेवलेले आहेत….
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी आपली वेगळी ओळख कार्यातून, वागण्यातून, स्पष्ट बोलण्यातून निर्माण केलेली आहे. विकासप्रिय नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिले जाते. स्पष्ट वक्ता, हजरजबाबी उत्तर देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बारामती येथे प्रचाराचा शुभारंभ होणार होता, त्यासाठी सकाळी आठ वाजता मुंबईवरून निघालेले अजितदादा बारामतीत नऊ वाजता विमानातून उतरणार होते. परंतु, विमानाचा अपघात होऊन अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातील नेते व कार्यकर्ते दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी माळशिरस शहरामध्ये शोक व्यक्त केलेला आहे. माळशिरस शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करून अजितदादांच्या दुःखामध्ये माळशिरस शहर सहभागी झालेले आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



