वेळापूर – शेरी रस्त्याची चौकशी करावी स्थानिक नागरिक व वाहनधारकांची मागणी, रस्त्याच्या साईड पट्ट्याच गायब ?

वेळापूर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील वेळापूर शहरातील वेळापूर निमगाव रस्त्यावरून वेळापूर शेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी करावी, अशी स्थानिक नागरिक व वाहनधारकांची मागणी होत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्याच गायब असल्याने अनेक वाहनधारक व वाटसरू यांना नाहक त्रास होत आहे.
वेळापूर – शेरी रस्ता ठेकेदाराने निकृष्ट का असेना रस्ता पूर्ण केलेला आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरमाच्या साईट पट्ट्या केलेल्या नाहीत. त्यामुळे सदरच्या रस्त्यावरून डबल वाहन बसत नाही. समोरून चार चाकी वाहन आल्यानंतर सायकल व दोन चाकी मोटरसायकल वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कितीतरी वाहनधारकांना घसरून दुखापत झालेली आहे. भविष्यात जीवितहानी सुद्धा होऊ शकते. सदरच्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, दूध व्यवसायिक, ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, शेतकरी बांधव यांना कायम येण्यासाठी रस्ता आहे. सदरच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासाची वर्दळ असते.

सदर रस्त्यावरील ठेकेदाराचे नाव, रस्त्यावर खर्च केलेली रक्कम, काम पूर्ण झालेला कालावधी व वेग-भाल दुरुस्ती अशी रस्त्याच्या कामाची माहिती असलेला फलक गायब झालेला आहे. त्यामुळे सदरचा रस्ता स्थानिक नागरिक व वाहनधारक यांना सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज किंवा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस कोणाकडे आहे याचा बोध होत नाही.
त्यामुळे वेळापूर – शेरी रस्ता असणाऱ्या बांधकाम विभागाने दोन दिवसात साईड पट्ट्या ठेकेदारांकडून घ्याव्यात अन्यथा स्थानिक नागरिक व वाहनधारक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यावेळेस मात्र सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची राहील अशा भावना स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी व्यक्त केलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



