ताज्या बातम्यासामाजिक

पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन

सातारा (बारामती झटका)

महाबळेश्वर आगारातील एका अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेत संवाद साधल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती. मात्र बसमध्ये प्रवासी भरल्यानंतरही बस न हलवल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पुढील प्रवासासाठी बस व रेल्वे गाठण्याची घाई असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.

यावेळी तेथे उपस्थित असलेले अधिकारी शाहरुख खान यांनी सुरुवातीला प्रवाशांशी नम्रपणे संवाद साधला. मात्र काही वेळातच त्यांचा बोलण्याचा सूर बदलल्याचे सांगितले जाते. हा प्रकार पाहून उपस्थित पत्रकारांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला.

या घटनेनंतर सातारा पत्रकार संघ आणि महाबळेश्वर पत्रकार संघाने तातडीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.

बैठकीस सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांच्यासह अमित वाघमारे, उमेश भांबरे, ज्ञानेश्वर भोईटे, चंद्रकांत देवरुखकर, अमोल निकम, कैलास मायणे, प्रवीण शिंगटे, गजानन चेंणगे, निनाद बाजारे, विशाल कदम, बाळ लाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी विठ्ठल हेंद्रे यांनी, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी निलंबनाची कारवाई झाल्याचे स्पष्ट केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button