संविधान बदलून लोकशाही धोक्यात आणण्याचा काँग्रेससह विरोधकांचा डाव : पालकमंत्री जयकुमार गोरे

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेत भाजपाचे शक्तिप्रदर्शन; हजारो कार्यकर्त्यांसह सोलापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
सोलापूर (बारामती झटका)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून भारतातील लोकशाही धोक्यात आणण्याचा काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. विरोधकांकडून देशभरात पसरविल्या जात असलेल्या कथित खोट्या नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देत जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेत ते बोलत होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून या पदयात्रेला सुरुवात झाली. हजारो तिरंगा आणि भाजपाचे ध्वज हाती घेतलेले कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापारी, तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात पदयात्रेचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली पदयात्रा बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्गे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
गोरे म्हणाले, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या आडून विरोधकांना देशात नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानप्रमाणे अराजकता निर्माण करायची आहे. परदेशातून मिळणाऱ्या निधीच्या आधारे आंदोलने उभी करून सर्वोच्च न्यायालय, संविधान आणि निवडणूक आयोग यांसारख्या घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संस्थांनी विरोधकांच्या इच्छेनुसार निर्णय द्यावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करण्याच्या नावाखाली विरोधक देशातील कोट्यवधी मतदारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

ज्या काँग्रेसने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात नऊ राज्यांतील सरकारे बरखास्त केली आणि देशावर आणीबाणी लादली, त्या काँग्रेसने लोकशाहीच्या रक्षणाची भाषा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसने मतदार यादीमध्ये बोगस नावे आणि बांगलादेशी घुसखोरांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप करत गोरे म्हणाले, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे (SIR) अशा त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेलाच विरोधक विरोध करत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोलापूरचे दोन्ही खासदार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले आहेत. मात्र, आता त्यांच्याकडूनच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. सत्ता मिळाली की ईव्हीएम योग्य आणि सत्ता गेली की ईव्हीएम चुकीचे, अशी भूमिका विरोधक घेत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्यासाठी संविधानात विशिष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. संविधानाच्या रक्षणाची भाषा करणाऱ्या विरोधकांना या तरतुदींची माहिती नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
देशात यापूर्वी अनेकदा एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. मृत व्यक्तींची, स्थलांतरित मतदारांची आणि बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत कायम ठेवावीत, अशी विरोधकांची भूमिका आहे का, असा सवाल त्यांनी केला.

विकासकामांनाही विरोधकांकडून विरोध होत असल्याचा आरोप करत गोरे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूरची पाणीपुरवठा योजना, शक्तिपीठ महामार्ग आणि उजनी जलाशयाशेजारी प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाचा उल्लेख केला. विकासाच्या प्रत्येक उपक्रमाला विरोध करण्याऐवजी त्यावर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांकडून पुष्पवृष्टी करीत पदयात्रेचे स्वागत
पदयात्रेच्या मार्गावर व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. देशातील लोकशाही आणि सामाजिक वातावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर भाजपाने आयोजित केलेल्या या पदयात्रेला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. सहभागी कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी व्यापाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली होती.
जंतर-मंतरवर हलगी वाजवून मतदार यादीत नावे येणार नाहीत!
निवडणूक आयोगाने सूचना देऊनही काँग्रेसने अनेक मतदान केंद्रांवर प्रतिनिधी नेमले नाहीत, अशी टीका गोरे यांनी केली. जंतर-मंतरवर जाऊन हलगी वाजविल्याने मतदार यादीत नावे समाविष्ट होणार नाहीत. त्यापेक्षा काँग्रेसने जनतेमध्ये जाऊन आत्मपरीक्षण करावे आणि जनतेने आपल्याला का नाकारले, याचा विचार करावा, असा टोला त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजय मालक देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन मालक पाटील, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीपभाऊ माने, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, आमदार समाधान आवताडे, मा. आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, भाजप प्रदेश सचिव तथा माजी आमदार राम सातपुते, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



