बारामती येथे शुक्रवारी विभागीय डाकअदालत

बारामती (बारामती झटका)
बारामती विभाग अंतर्गत येणाऱ्या बारामती पुरंदर शिरूर दौंड आणि इंदापूर तालुक्यातील संबंधित पोस्ट ऑफिसच्या कार्यपद्धती विषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधीक्षक, डाकघर बारामती येथे दुपारी ३ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टाची सेवा ही देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयव करते. ही सेवा देतांना, संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्धल तक्रार करण्याची वेळ येते. हया तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार विनाविलंब सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
डाक अदालत मध्ये पोस्ट ऑफिसच्या कार्यपद्धती विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधान कारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बैंक व मनिऑर्डर बाबतच्या, तक्रारी विचारात घेतल्या जातील, तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार श्री केतन डी. शित्रे, डाक अधीक्षक, बारामती विभाग, बारामती ४१३१०२ यांचे नावे दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे बारामती डाकघर विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



