अवैध शेती औषधे बाळगल्या व विकल्याप्रकरणी तक्रार दाखल

सुमारे ३६ लाख रुपयांचा साठा
अकलूज (बारामती झटका)
कोणताही विक्री साठवणुकीचा परवाना नसताना सुमारे ३६ लाख ४० हजार २०० रुपये किंमतीची अवैध कृषी औषधे व सूक्ष्म अन्नद्रव्ये बाळगल्या प्रकरणी व ती पावती न देता शेतकऱ्यांना विकून शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याची तक्रार सोलापूर जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने जांभूड, ता. माळशिरस येथील नामदेव पाटील यांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात केली आहे.
माळशिरस पंचायत समितीतील कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक नितीन चव्हाण यांनी ही तक्रार अकलूज पोलिस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद सोलापूरच्या कृषी विभागाच्या भरारी पथकातील पथक प्रमुख जिल्हा परिषद कृषी अधिकारी हरिदास हावळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य सागर बारवकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बाळू बागल यांना खबर मिळाल्याने दि. ५ जून रोजी त्यांनी जांबूड, ता. माळशिरस येथील नामदेव पाटील यांच्या शेतातील वस्तीवर छापा टाकला असता त्यांना तेथे ए. जी. हायफा ऍग्रो कोंढवा, पुणे, भुमिवेदा मार्केटिंग एल. एल. पी. असे नाव व पत्ता असलेली काही अवैध पद्धतीने विनापरवाना खत उत्पादन केली जाणारी जैविक व रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून आली.
यामध्ये १) हायफा ४०-१०-९ असे लिहिलेली प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाची २००० पाकिटे किंमत १३ लाख ९८ हजार
२) प्लांट गार्ड. ५०० ग्रॅम वजनाची १००० पाकिटे किंमत ८ लाख १ हजार
३) हाय फा कंट्रोल ५०० ग्रॅम वजनाची ४०० पाकिटे किंमत ३ लाख ४६ हजार
४) सल्फग्रो सल्फर ५०० ग्रॅम वजनाची ४०० पाकिटे किंमत ३ लाख ५५ हजार ६००
५) BS ४० ॲक्टीव्हेटर ५०० ग्रॅम वजनाची ४० पाकिटे ३४६४० ६) नेमेटो गार्ड ५०० ग्रॅम वजनाची २०० पाकिटे किंमत १ लाख ५९ हजार ८०० ७) भुमिवेदा १ किलो वजनाची २०० पाकिटे किंमत २ लाख ३४ हजार ८) डेमो बॉक्स तसेच विना नावाच्या बाटल्या,पाकिटे
या मालाची विक्री परवाने नसणे, खरेदी बिले नसणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, साठवणूक परवाना नसताना साठवणूक करणे, उत्पादक किंवा शासनाकडून विक्री परवाना न घेणे, त्याचे अभिलेख न ठेवणे, मालावर अस्तित्वात नसलेले पुणे, टेंभुर्णी असे पत्ते टाकणे व शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केली असा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तो माल तेथेच ठेऊन तो न हलवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत अकलूज पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.