उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून राष्ट्रीय स्तरावर बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा दिल्ली येथे गौरव

बार्शी (बारामती झटका)
मतदान अधिकारी हा निवडणूक आयोगाचा कणा व श्वास असून तो अधिक सक्षम झाला पाहिजे. सध्या भारत निवडणूक आयोगाच्या भारत आंतरराष्ट्रीय लोकतंत्र व निर्वाचन प्रबंध संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने चार राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पर्यवेक्षक, केंद्रास्तरीय मतदान अधिकारी यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण व चर्चासत्र दि. ११ जून ते दि. १३ जून दरम्यान आयोजित केले होते.
केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांना अधिक सक्षम करून निवडणूक आयोगाच्या बीएलओ ॲप मध्ये सुधारणा करून मतदार यादी अधिक सदोष बनविणे, ॲप मध्ये सुधारणा करणे यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातून १३२ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मतदान अधिकारी श्री. अनिल देशपांडे यांनी तेथील सर्व चर्चासत्रात भाग घेऊन आयोगाला अनेक सुधारणा सुचविल्या. या सुचविलेल्या सुविधांमुळे मतदार नोंदी अधिक अचूक व निर्दोष होणार आहेत. तसेच अनिल देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या ॲप मध्ये अनेक सकारात्मक बदल सुचविले, याची आयोगाने दखल घेतली.
महाराष्ट्राचे सहायक मुख्य निवडणूक अधिकारी श्री. किरण शार्दूल यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करत अनिल देशपांडे यांचे अभिनंदन केले. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, संगणक परिचालक आकाश गुळवे यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.