जिवंतपणी कष्ट, मृत्यूनंतरही हाल… तिरवंडीला सन्मानाची स्मशानभूमी कधी मिळणार ?

तिरवंडी (बारामती झटका)
तिरवंडी गावात आजही स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तिरवंडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विठ्ठल वाघमोडे यांनी गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती यांना निवेदन दिले आहे.
“माणूस आयुष्यभर कष्ट करतो, गावाच्या विकासासाठी योगदान देतो. मात्र मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही सन्मानाची जागा उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“माझ्या पेटत्या देहाला तरी सुखाने पेटू द्या, आमच्या हक्काची गावाला स्मशानभूमी तरी मिळू द्या !” अशा आर्त आणि संतप्त शब्दांत ग्रामस्थांनी प्रशासनाला सवाल केला आहे.

गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. स्मशानभूमी नसल्यामुळे दुःखाच्या प्रसंगातही नागरिकांची फरफट होत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा, निवेदने आणि मागण्या करूनही प्रश्न प्रलंबितच असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तिरवंडी ग्रामस्थांची मागणी आहे की, संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन स्मशानभूमीचे रखडलेले काम पूर्ण करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी व ॲड. विठ्ठलराजे वाघमोडे पाटील यांनी दिला आहे.
आता प्रशासन जागे होणार का, की तिरवंडीकरांना सन्मानाच्या स्मशानभूमीसाठी आणखी कित्येक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



