ताज्या बातम्यासामाजिक

जावयासाठी केलेल्या सोनेरी धोंड्याने मांजरीचे प्राण गेले!

बीड (बारामती झटका)

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका वस्तीवर 4 जून रोजी धोंडा महिन्याच्या संबंधात एक विलक्षण दुःखद घटना घडलीय. ‘धोंड्या’च्या महिन्यासाठी आलेल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो धोंडा इतर धोंड्यांसोबत ठेवला गेला.

मात्र, स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा खाऊन टाकला, त्यामुळे घरच्यांची धांदल उडाली. मांजरीने गिळलेली अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चक्क चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आले.

तिच्या विष्ठेतून ही अंगठी बाहेर पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने तिला पशुवैद्यकाकडे नेऊन उलटीसाठी औषधे देण्यात आले. परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात मांजरीचा जीव गेला.

त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. मांजरीला पाजलेले औषध नेमके उलटीचेच होते की जिवावरचे होते हे कळायला मार्ग नाही. मात्र जावयाच्या सोनेरी धोंड्यापायी तिचा जीव गेला हे नक्की!

रिल्सच्या प्रभावाखाली येऊन खेड्यापाड्यात लोक कर्ज काढून धोंडामासाची ही परंपरा पाळताना लोक आपल्या खिशात धोंडा घालून घेत आहेत आणि त्याचे त्यांना कसलेही शल्य नाही की कसली खंत नाही!

ग्रामीण भागात पाऊस नाही, पाणी नाही, पीकपाणी नाही, खते नाहीत की पिकांना भाव नाही तरीदेखील थाटात धोंडा देण्याचा सपाटा गावांमध्ये सुरु आहे!

ह्या प्रकाराला वेळीच आवर घातला गेला नाही तर ही परंपरा कुप्रथेत परिवर्तित व्हायला वेळ लागणार नाही आणि आपला समाज असा आहे की, त्याला चांगली सवय लवकर लागत नाही आणि चुकून जरी चांगली सवय लागली तरी ती लगेच सुटते!

मात्र त्याचवेळी आपला कावेबाज ढोंगी समाज, वाईट परंपरा खूप लवकर आत्मसात करतो आणि त्यांच्या इतका आहारी जातो की, त्या सवयी कधीही सुटत नाहीत मात्र कुणालाही याचे सोयर सूतक नसते! मग ह्यासाठी सासरचा सातबारा गहाण पडतो तर कधी असा मांजरीसारखा जीव जातो!

जे विवेकी विचारांचे लोक आहेत त्यांनी तरी ह्यासाठी समाजाचे कान टोचले पाहिजेत! मात्र आजकाल कुणाला काही शहाणपण सुचवणे म्हणजे दाणे टाकून गाढव उडवून घेण्यासारखे आहे हे तमाम सभ्य विवेकी लोकांना कळून चुकलेय. त्यामुळेच कुणी कुणाच्या अध्यात मध्यात पडत नाही!

वास्तवात हा धोंडा महिना, ही कालगणन प्रक्रियेतील एक अतिशय सामान्य घटना आहे! सौरवर्ष 365 दिवसांचे तर चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. या अकरा दिवसांच्या फरकामुळे दर 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना तयार होतो.

ह्या तेहतीस महिन्यांच्या बदल्यात तेहतीस प्रकारचे वाण जावयाला द्यायचे असा रिवाज होता. प्रत्येक महिन्यास एक देवतेच्या हिशोबाने 33 कोटी (इथे कोटी ह्या शब्दाचा अर्थ करोड नसून वाण असा अपेक्षित आहे) देवतांना स्मरून जावयाला 33 अनारसे, 33 धोंडे किंवा अन्य गोड पदार्थांचे वाण देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. या वाणावर जेवणाचे ताट दिले जाई. त्या काळी केवळ जस्त धातूची भांडी असत म्हणून हे ताट पितळी असे!

लेकीच्या जावयाच्या घरी प्रकाश राहावा म्हणून दिवा दिला जाई! स्टीलचा शोध लागलेला नव्हता आणि तांब्याची निरंजने वापरात होती म्हणून हा दिवादेखील तांब्याच्या धातूचा असे! आता एरव्ही कधीही पितळ तांबे न वापरणारे लोक अजूनही पितळी ताट, तांब्याचा दिवा दिला जातो. लोकांनी ह्यात सोने चांदी ऍड केलेय. कपड्याचा आहेर आणि जेवणावळी असे ह्याचे स्वरूप झालेय.

या महिन्यामध्ये जावयाला आवर्जून ‘धोंडे’ (पुरण भरून कणकेचे उकडलेले गोड गोळे किंवा दिंड) खाऊ घालण्याची प्रथा आहे! हा पदार्थ दिसायला धोंड्यासारखा गोल असतो, या पदार्थावरूनही या महिन्याला धोंड्याचा महिना म्हटले जातेय. वर्षातले दिवस वाढून येतात, महिना वाढतो म्हणून हा अधिक मास होय! एके काळी ह्या महिन्यात कथित रित्या शुभ ठरवली गेलेली कार्ये केली जात नसत!

प्रत्येक गोष्टीत धर्म शोधणाऱ्या चलाख प्रवृत्तींनी ह्यातदेखील हात धुवून घेतले, ह्याच्या पाठीमागेही धार्मिक अधिष्ठान खपवले. त्यानुसार जेव्हा अधिक मास पंचांगात आला, अतिरिक्त महिन्याला ‘मलमास’ मानले जात असे. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आणि स्वतःचे ‘पुरुषोत्तम’ हे नाव या महिन्याला दिले अशी आख्यायिका रूढ झालीय! तेव्हापासून या महिन्यात विष्णू पूजा, दान, जप आणि तीर्थयात्रेला मोठे महत्त्व प्राप्त झाले, हे कुणी केले असेल हे वेगळे सांगायला नको!

काही शतके मागे जाऊन पाहिले तर असे लक्षात येईल की ह्या गोष्टी कृषक परंपरेशी नाते सांगणाऱ्या होत्या. तेव्हा बहुसंतती असे, सर्रास बालविवाह होत असत. मुलींची हौस मौज होत नसे; त्यांच्या संसारासाठी फार काही करता आले नाही ह्याची खंत असे.

एरव्ही सणावाराला माहेरी येणाऱ्या मुलीला खास तिच्यासाठी तिच्या नवऱ्यासह बोलवता यावे असे निमित्त सापडत नव्हते. मग ज्या महिन्यात कोणतेच कार्य केले जात नसे त्या महिन्यात खास लेक जावयाला बोलवून चार पैसे वाचवून त्यांना गोडधोड खाऊ घातले जाई.

त्या काळी आतासारखे रोज उठून पंचपक्वान्ने खाल्ली जात नसत, दर महिन्याला कपडे खरेदी होत नसे आणि दरसाली भांडीकुंडी विकत घेतली जात नसत ह्या सर्व गोष्टी चैन मानल्या जात! त्यामुळे अधिक मासात घरी येणाऱ्या लेकीला जावयाला धोंडे खाऊ घालून तिला गोडधोड देऊन ताट, निरंजन आणि साडीचोळी, जावयाला धोतराचे पान, गमछा, टोपी दिले जाई! त्याचा कोण आनंद असे!

आता ह्यातले सगळे प्रयोजन लयास गेले आणि उरली ती दाखवण्यासाठीची धडपड ती देखील विकृतीकडे झुकणारी! ह्याचा एक भपकेबाज इव्हेन्ट झालाय, भावकीला आणि गावकीला दाखवून देण्याची एक रूढी झालीय! आणि ह्यात चढाओढीने सामील होण्याची अहमहमिका लागली आहे! अर्थातच ह्यालादेखील डिजिटल हातभार लागला आहे!

ह्याच भपकेबाजीतून अनेक नव्या गोष्टी ह्यात घुसडल्या जात आहेत. काही दशकानंतर मूळ परंपरा लोप पावलेली असेल आणि घुसडलेल्या नीतीभ्रष्टतेच्या गोष्टी मात्र उरलेल्या असतील! नाहीतरी अलीकडे बहुसंख्य लोकांनी विवेकाची कास सोडलीय त्याचे समाजाला कसलेच शल्य नाहीये! सबब आपण जिवाला फारशी टोचणी लावून घ्यायचे कारण नाही! अन्यथा त्या मांजरासारखी आपली अवस्था होईल! – समीर गायकवाड

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button