ताज्या बातम्याराजकारण

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सोलापूर विधान परिषद: महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना आशीर्वाद…

महायुतीचा विजय निश्चित असल्याचा नेत्यांचा विश्वास…

मुंबई (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या तिन्ही शीर्ष नेत्यांनी राजेंद्र राऊत यांना निवडणुकीसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

“महायुती सरकार सोलापूरच्या शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. विधान परिषदेत जनतेचे प्रश्न भक्कमपणे मांडण्यासाठी राजेंद्र राऊत हेच अत्यंत सक्षम उमेदवार आहेत,” असा विश्वास यावेळी तिन्ही नेत्यांनी संयुक्तपणे व्यक्त केला.

राजेंद्र राऊत हे माझे विश्वासू सहकारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांच्या पक्षनिष्ठेचे आणि कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “राजेंद्र राऊत हे माझे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी बार्शीत भाजपची संघटना मजबूत केली आणि त्यानंतरची प्रत्येक निवडणूक जिंकून दिली. अशी प्रामाणिक आणि कष्टाळू माणसे हीच पक्षाची खरी ताकद आहेत.”

महायुती धर्म पाळून पूर्ण पाठिंबा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या एकजुटीवर भर देत सांगितले की, “महायुती धर्म पूर्णपणे पाळून आम्ही राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केवळ महायुतीच करू शकते आणि राजेंद्र राऊत हेच काम विधान परिषदेत अधिक प्रभावीपणे करतील.”

शेतकरी, महिलांचा आवाज बुलंद करणार – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर करत सांगितले की, “महायुतीच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. राजेंद्र राऊत हे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी विधान परिषदेत नक्कीच प्रभावी आवाज उठवतील.”

नेतृत्वाचे मानले आभार; विकासाची दिली ग्वाही
उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आणि नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे राजेंद्र राऊत यांनी महायुतीच्या संपूर्ण शीर्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानले. “सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहीन,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान महायुतीचे सोलापूर आणि परिसरातील प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री), सचिन कल्याणशेट्टी (आमदार, अक्कलकोट), राणाजगजितसिंह पाटील (आमदार, तुळजापूर), समाधान आवताडे (आमदार, पंढरपूर-मंगळवेढा), बाबासाहेब देशमुख (आमदार, सांगोला), शहाजी पवार आणि मंगेश चिवटे यांच्यासह महायुतीचे इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राजेंद्र राऊत यांच्या या मुंबई दौऱ्यामुळे आणि महायुतीच्या नेत्यांकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button