बुलढाण्यात 24 वर्षांनी लेक परतला आईच्या कुशीत, एसआयआर यादी पडताळणीतून उलगडा, माय लेकराच्या भेटीने अश्रूंचा बांध फुटला..

बुलढाणा (बारामती झटका)
मतदार यादीचं पुनरिक्षण… (SIR) हे ऐकलं सध्या काय हे अजून नवीन अशी भावना मनात येते, याशिवाय डोळ्यासमोर येतं ते सरकारी कामकाज. पण, याच प्रक्रियेमुळे एका आईची (Mother) तब्बल 24 वर्षांची प्रतीक्षा संपली. घर सोडून गेलेला मुलगा मोठा होऊन पुन्हा आईच्या कुशीत परतला. बुलढाण्यातील (Buldhana) मलकापुरात घडलेली ही घटना केवळ भावनिक नाही, तर शासन व्यवस्थेच्या संवेदनशील चेहऱ्याचंही उदाहरण ठरली आहे. आई आणि लेकराची ही भेट आनंदाश्रूंचा बांध फुटणारी अन् बीएलओंच्याही डोळ्यात पाणी आणणारी होती.

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केडगावचा नवनाथ धोंडीबा गायकवाड. कौटुंबिक वादानंतर तब्बल 24 वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला. अनेक गावांमध्ये भटकंती करत तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात स्थायिक झाला. इथे संसारही थाटला, पण मागे आई, भाऊ आणि बहीण मात्र वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत राहिले. 24 वर्षांपासून लेकाच्या शोधात असलेल्या आईसाठी अखेर तो दिवस उजाडला. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन… म्हणजेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक बीएलओ अनिल भोंबे माहिती संकलनासाठी नवनाथ यांच्या घरी पोहोचले. पडताळणी करताना नवनाथचं नाव सोलापूरच्या मतदार यादीशी जोडलेलं असल्याचं समोर आलं. त्यानंतर करमाळा येथील बीएलओंशी त्यांनी संपर्क केला आणि उलगडलं तब्बल 24 वर्षांपासून हरवलेल्या मुलाचं रहस्य…
मुलगा जिवंत असल्याचं कळताच आई, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास करून ते थेट मलकापुरात पोहोचले. सकाळी अचानक मुलासमोर उभे राहिले. 24 वर्षांनंतर आईने आपल्या लेकराला मिठी मारली, आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाऊ, बहीण आणि उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या..
सुनेला दिलं सासूबाईनं मंगळसूत्र
नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला नेमकं काय घडत आहे, हेच समजलं नाही. पण सत्य समजताच वातावरण आणखी भावनिक झालं. आईने आपल्या सुनेच्या गळ्यात स्वतःचं सोन्याचं मंगळसूत्र घातलं आणि प्रेमाने म्हणाली.. “आता इथे नका राहू… आमच्यासोबत घरी चला…” नवनाथ यांनीही लवकरच गावी येण्याचं आश्वासन दिलं. या भेटीतील आणखी एक हळवा पैलू म्हणजे नवनाथ यांचे धाकटे भाऊ अशोक… ते डायलिसिससाठी रुग्णालयात दाखल होते. पण उपचार पुढे ढकलून त्यांनी आधी भावाला भेटणं महत्त्वाचं मानलं.. रक्ताच्या नात्याची ओढ किती विलक्षण असते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.

माणुसकीचा सुंदर चेहरा दिसला
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू झालेली एसआयआर प्रक्रिया… एका कुटुंबासाठी मात्र आयुष्यभर विसरता न येणारा क्षण घेऊन आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका आईला तिचा हरवलेला मुलगा, एका भावाला त्याचा मोठा भाऊ आणि एका बहिणीला तिचा लाडका भाऊ तब्बल २४ वर्षांनी परत मिळाला. सरकारी कागदपत्रांची पडताळणी आणि त्यातून जुळलं तुटलेलं नातं. मलकापुरातील ही घटना संवेदनशील प्रशासन आणि माणुसकीचा एक सुंदर चेहरा समोर आणणारी ठरली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



