ऑटोरिक्षा भाडेदरात १ सप्टेंबर पासून सुधारणा; पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रु.

बारामती (बारामती झटका)
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सुधारित भाडेदरास मान्यता दिली असून १ सप्टेंबर २०२६ पासून ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये” व प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील (पुणे व पिंपरी-चिंचवड) ऑटोरिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागातील ऑटोरिक्षांसाठी रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांमधून प्रवाशांसोबत असलेल्या ६० x ४० सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या सामानासाठी ३ रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

सुधारित भाडेदर लागू झाल्यानंतर ऑटोरिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर मीटर कॅलिब्रेशन न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर नियमानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऑटोरिक्षा चालक व प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत सुधारित भाडेदरानुसार तात्पुरते टेरिफ कार्ड तयार करण्यात येणार आहे. हे कार्ड २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत वैध राहणार असून त्यानंतर टेरिफ कार्डचा वापर करता येणार नाही. प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



