ताज्या बातम्याराजकारण

महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीत मोहिते पाटील गटाला धोबीपछाड होणार….

पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आमदार राम सातपुते यांच्या विचारांचा भाजपचाच उपनगराध्यक्ष होणार…

महाळुंग (बारामती झटका)

महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. भिमराव हनुमंत रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सचिन पाटील यांची महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या पीठासन अधिकारी पदावर नेमणूक करून उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार दि. ११/९/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाळुंग श्रीपुर नगरपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केलेले आहे.

सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये मुख्याधिकारी नामनिर्देशन पत्र स्वीकारणार. १ नंतर पीठासीन अधिकारी नामनिर्देशन पत्राची छाननी करणार. छाननी नंतर पंधरा मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिला जाईल. बरोबर दोन वाजता पिठासीन अधिकारी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पाडतील. मोहिते पाटील गटाचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव होऊन पदमुक्त झालेले आहेत‌.

मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या अनेक नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला असल्यामुळे मोहिते पाटील गटाला धोबीपछाड झालेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या विचारांचा भाजपचाच उपनगराध्यक्ष होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

महाळुंग श्रीपूरच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक व स्वाभिमानी नगरसेवक यांचा उपनगराध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठरावात सिंहाचा वाटा आहे. महाळूंग नगरीचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी पहिल्यापासूनच माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात आहेत. महाळुंगचे ग्रामदैवत यमाई देवी मंदिर परिसर विकसित करण्यामध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तत्कालीन आमदार बबन दादा शिंदे यांच्या माध्यमातून पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिलेला होता. ग्रामदैवत यमाई देवीचाच आशीर्वाद असल्याने शुक्रवारी भाजपच्याच विचारांचा उपनगराध्यक्ष होणार असल्याने आई यमाई देवीचा कौल असल्याचे भाविक भक्तांमधून चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button