ताज्या बातम्याशैक्षणिक

संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची आयएपी एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी

संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला आयएपी एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 मध्ये तीन पुरस्कार ‌‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय‌’, ‘टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड सेंटर‌’ आणि ‘स्पेशलाइज्ड ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन सेंटर ‌’

पुणे (बारामती झटका)

संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 मध्ये उल्लेखनीय यश मिळवित तीन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. नवी दिल्ली येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित वर्ल्ड फिजिओथेरपी एशिया वेस्टर्न पॅसिफिक (डब्ल्यूपीएडब्ल्यूपी) या प्रादेशिक परिषदे दरम्यान झालेल्या विशेष समारंभात हे तीन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) चे अध्यक्ष डॉ.संजीव झा यांच्या हस्ते संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राधा भट्टड यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला ‌‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार‌’ प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेचे प्रमुख रुग्णालय असलेल्या संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन (एसआयओआर) ला ‌‘टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड सेंटर अवॉर्ड‌’ आणि ‌‘स्पेशलाइज्ड ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन सेंटर अवॉर्ड हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सुमारे 70 वर्षांची परंपरा असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आयएपी या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आलेले आयएपी एक्सलन्स अवॉर्ड्स फिजिओथेरपी शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि संशोधनातील योगदानाची दखल घेतात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि डॉ. बीसी रॉय पुरस्काराचे मानकरी डॉ. के. एच. संचेती यांच्या दूरदृष्टीतून 1995 मध्ये स्थापन झालेल्या या नॅक मान्यताप्राप्त संस्थेत फिजिओथेरपी पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच.डी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव देण्यावर भर दिला जातो. यामध्ये प्रमुख टर्शरी केअर रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये विविध विभागांमध्ये प्रशिक्षण, आधुनिक पुनर्वसन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. तसेच संशोधनासाठी विशेष प्रोत्साहन, राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख परिषदांमध्ये सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासालाही चालना मिळते.

या यशाबद्दल बोलताना संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी म्हणाल्या, “आयएपी एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 हे आमच्या गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या शैक्षणिक दृष्टिकोनाला मिळालेली महत्त्वपूर्ण मान्यता आहे. सखोल वैद्यकीय प्रशिक्षण, उपचारांच्या परिणामांवर आधारित संशोधन आणि आधुनिक पुनर्वसनशास्त्राचा शिक्षणात सुरुवातीपासूनच समावेश, या आधारांवर आमची शिक्षणपद्धती विकसित झाली आहे.

सर्वोत्कृष्ट महाविद्यालय” हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या जडणघडणीत आणि विकासात योगदान देणाऱ्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची दखल घेणारा आहे. तसेच, संस्थेचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती यांची दूरदृष्टी आणि संस्थेच्या या प्रवासाचा भाग राहिलेल्या प्रत्येक प्राचार्य, प्राध्यापक, वैद्यकीय तज्ज्ञ, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि टीम सदस्यांच्या योगदानाचा हा सन्मान आहे.

हा गौरव फिजिओथेरपी शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टतेचे मानदंड अधिक बळकट करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो. त्याचबरोबर, आरोग्यसेवा व्यवस्थापन व नर्सिंग, एक्सप्रेसिव्ह आर्टस् आणि मुव्हमेंट थेरपी तसेच क्लिनिकल फेलोशिप्स या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आणि युवा व्यावसायिकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याची आमची परंपरा पुढे नेण्यासाठीही हा पुरस्कार आम्हाला प्रोत्साहन देतो. या सर्व उपक्रमांमधून आरोग्यसेवा क्षेत्रातील शिक्षण, उपचार आणि सेवेसाठीची आमची सामूहिक बांधिलकी अधोरेखित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button