राजे-दादांचा फलटणमध्ये दिलखुलास संवाद; रामराजेंची रणजीतदादांना मिश्किल साद!

‘जाऊ का? परवानगीने आता…’ म्हणत रामराजेंची कोपरखळी; रणजीतदादांनी हस्तांदोलनातून राखला सन्मान, राजकीय तणावावर संवादाची फुंकर
फलटण (बारामती झटका)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फलटणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना रविवारी सकाळी मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राजे गट आणि दादा गट यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच रंगत असते. मात्र, मतदान केंद्रावर विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात झालेल्या दिलखुलास संवादाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
फलटण येथील श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर नगरपरिषद शाळा क्रमांक आठ या मतदान केंद्रावर सकाळी साडेनऊच्या सुमारास रामराजे मतदानासाठी दाखल झाले. त्यापूर्वीच रणजीतदादा नाईक निंबाळकर आणि शिवरूपराजे खर्डेकर मतदान केंद्रात उपस्थित होते. केंद्रात प्रवेश करताना रामराजेंनी दोघांना हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर रणजीतदादांकडे पाहत मिश्किलपणे, ‘जाऊ का? परवानगीने आता…’ अशी कोपरखळी मारली.
रामराजेंच्या या विनोदी टिप्पणीला रणजीतदादांनीही हसतमुखाने प्रतिसाद दिला. त्यांनी रामराजेंशी हस्तांदोलन करत सन्मान राखला. राजकीय मतभेद आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रसंगामुळे मतदान केंद्रावरील तणावाचे वातावरण काही काळ हलके झाले.
फलटणच्या राजकारणात राजे आणि दादा गटांमधील संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घेता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकलेले नेते वैयक्तिक पातळीवर मात्र परस्परांचा सन्मान राखू शकतात, याचे दर्शन या प्रसंगातून घडले. त्यामुळे या भेटीची चर्चा केवळ फलटणपुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या २१ संचालक जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांसाठी रविवारी जिल्ह्यातील अकराही तालुक्यांत मतदान सुरू आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर, माणमध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ, तर फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे.
एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असताना दुसरीकडे फलटणमध्ये राजे-दादांमधील या खेळीमेळीच्या संवादाने राजकारणातील कटुतेपेक्षा परस्पर सन्मान मोठा असल्याचा संदेश दिला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबांच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेची आठवण करून देणारा हा प्रसंग ठरला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



