दिवाळीनिमित्त तोंडले येथे मोफत साखर वाटप कार्यक्रम

मंगलमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक शंभुराजे निकम यांच्यातर्फे तोंडले येथील वॉर्ड क्र. 2 मधील गोरबरीब कष्टकरी जनतेला दिवाळीनिमित्त मोफत साखर वाटप
तोंडले (बारामती झटका)
तोंडले गाव व पंचक्रोशीतील सुसंस्कृत पाच पिढ्यांचे माळकरी घराणे म्हणून निकम परिवार सर्वपरिचित आहे. शेती हा निकम परिवाराचा पारंपरिक व्यवसाय आहे. धार्मिक कार्यासह राजकारण आणि समाजकारणातही निकम घराणे नेहमी अग्रेसर असते. तसेच गावातील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
संताजी सुखदेव निकम यांनी तोडले गावचे उपसरपंच पद भूषवले आहे. संताजी (आप्पा) निकम यांचा तोंडले गावातील शिक्षण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषि, संप्रदाय, राजकारण व समाजकारण सर्व प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो. गावच्या विकासकामाध्ये आप्पांचे मोठे योगदान आहे. आप्पांच्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळात तोंडले गावचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. पायाभूत सुविधांचा भरपूर विकास झाला. गावच्या विकासाला नवी दिशा मिळाली. अनेक प्रकारे विविध योजनांच्या मार्फत गावासाठी भरीव विकासनिधी मिळाला होता. गावचा विकास करत असताना संताजी आप्पा यांनी कधी जात धर्म बघितला नाही. नियमावर बोट न ठेवता सर्वसामान्य गरजवंत लोकांसाठी नेहमी प्राधान्याने काम केले. निवडणुकीपुरते राजकारण बाकी वेळेस फक्त समाजकारण आणि लोकांचे हित जोपासले.
तोंडले गावातील माध्यमिक शाळेची इमारत जीर्ण झाली होती. काळानुसार विद्यार्थ्यांची संख्याही वाढली होती. खासगी शिक्षण संस्थेला जागेचा प्रश्न होता. नवीन इमारत बांधण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता होती. शेवटी जागेअभावी शिक्षण संस्थेने दुसऱ्या गावी स्थलांतर करण्याचा निर्णय केला. परंतु गावातील विद्यार्थ्यांसाठी गावातच शिक्षणाची सोय ह्यावी. यातूनच गावच्या तरुणांचे उद्याचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन संताजी आप्पा यांनी पुढाकार घेतला. तोंडले गावातील मुख्य चौकातील मोक्याची जागा हनुमान विद्यामंदिर प्रशाला तोंडले या खासगी संस्थेला शाळेसाठी मोफत दिली.
संताजी निकम यांना विनायक आणि शंभुराजे असे दोन चिरंजीव. थोरले चिरंजीव विनायक हे बँकिंग क्षेत्रात कार्यरत असतात व धाकटे चिरंजीव आणि निकम परिवारातील पाचव्या पिढीतील उद्योगरत्न मंगलमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक शंभुराजे निकम. शंभुराजे यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तसेच वडिलांचा राजकारण आणि समाजकारणाचा वसा पुढे चालू ठेवण्याचे कामही दोन्हीही बंधूंच्या वतीने खांद्याला खांदा लावून चालू असते.
उद्योगरत्न शंभुराजे यांचेकडून तोंडले गावातील गोरबरीब घरातील अनेक मुलींच्या लग्नासाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. दुष्काळ परिस्थितीत गावातील नागरिकांसाठी स्वखर्चाने बोअर मधील नवीन मोटार बसवून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. गावातील गरीब परिस्थिती असलेल्या हुशार मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत चालूच असते. गोरगरीब जनतेच्या दवाखाना, ऑपरेशन, दैनंदिन गरजा इ. अनेक प्रकारच्या अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करतात. गावातील तरुण पिढीमध्ये विनायक भैय्या निकम यांचाही दांडगा जनसंपर्क आहे. सर्व जातीधर्मातील तरुण पिढी विनायक भैय्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. दोन्ही मुलांनी आप्पांचे राजकारणाचे डावपेच जवळून बघितले आहेत. जसे की त्यांच्या रक्तातच राजकारण आहे. लोकांमध्ये राहून लोकांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होऊन तोंडले गावच्या वॉर्ड नंबर 2 मध्ये आपले वर्चस्व स्थापन केले आहे. वॉर्ड नंबर हा संताजी आप्पांचा बालेकिल्ला बनवला आहे.
वॉर्ड नंबर 2 हा बालेकिल्ला बनवणे बोलण्याएवढे सोपे काम नाही. निवडणुकीत मतदान मागण्यापुरते लोकांच्या दारात जाऊन चालत नसते. त्यासाठी संताजी आप्पा अविरत 24 तास पूर्ण 5 वर्षे जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असतात. 2 नंबर वॉर्ड मध्ये कुणाच्याही घरी दुःखद घटना घडल्यास त्या घरी सावडायच्या दिवशी चहापानासाठी चहा पावडर आणि साखर मात्र आप्पांकडून पोहोच केली जाते. मदत जरी छोटीशी असली तरी त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन मदतीचा हातभार लावणे यातूनच खरी माणुसकी जपली जाते. हीच खरी मृतआत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली असते, अशी आप्पांची शिकवण आहे.
असाच एक उपक्रम तोंडले गावातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी राबवला जातो. 2 नंबर वॉर्ड सह सर्व गावातील परिवारांना दिवाळीला मोफत साखर वाटप केली जाते. गेली 16 वर्ष अखंडपणे हा उपक्रम चालू आहे.

काळाच्या ओघात निकम परिवाराचा आधारवड सुखदेव विठोबा निकम यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सुखदेव विठोबा निकम यांनी वयाची शंभरी पार केली होती. ते धार्मिक तसेच पांडुरंगाचे भक्त होते. कीर्तन, भजन याची आवड होती. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्या हातात तुकारामांची गाथा होती. सुखदेव विठोबा निकम हे आबा या नावाने सर्वपरिचित होते. वारकरी संप्रदायात असल्याने पंचक्रोशीत आबांचा परिचय होता. आबांचे दुःखद निधन झाल्याने निकम परिवाराला आपले सण साजरे करता आले नाहीत. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, महागाई वाढलेली आहे. या परिस्थितीत आपले दुःख विसरून दुसऱ्यांच्या सुखात आपले सुख या उक्तीप्रमाणे…
सुखदेव विठोबा निकम यांच्या पुण्यस्मरणार्थ मंगलमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक शंभुराजे निकम यांच्यातर्फे श्री. संताजी सुखदेव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडले गावात दिवाळीनिमित्त मोफत साखर वाटपाचे आयोजन केले आहे.
‘दीपावली हा आपल्या भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव प्रत्येकाच्या मनात एक नवी उमेद, नवा उत्साह आणि आशेचा किरण घेऊन येतो. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे घराघरांमध्ये लागणारे दिवे, दारासमोरील देखणी रांगोळी, आकाशात चमकणारा कंदील आणि जिभेला तृप्त करणारा गोडधोड फराळ. परंतु सणाचा हा खरा आनंद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजेच आपल्या गोरगरीब आणि कष्टकरी सर्वसामान्य बांधवांपर्यंत हा आनंद पोहोचतो ‘
‘सण सर्वांसाठी सारखाच असतो, पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. आपल्या अवतीभवती असे अनेक कष्टकरी, मजूर आणि गरीब परिवार आहेत, वाढत्या महागाईच्या काळात दिवाळी गोड करणे या सर्वसामान्य कुटुंबांसाठी एक मोठे आव्हान असते. अशा वेळी समाजाचे देणे लागण्याच्या भावनेतून मोफत साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ‘ हा उपक्रम केवळ वस्तू वाटपाचा नसून कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साखर वाटपासोबत समाजातील बंधुभाव आणि एकात्मता अधिक घट्ट होते. हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश असेल. हा मोफत साखर वाटप कार्यक्रम खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजनाचे सार्थक करणारा ठरेल. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! वैकुंठवासी ह. भ. प. सुखदेव विठोबा निकम यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त तोंडले गावातील वार्ड क्रमांक दोन मधील सर्व गोरगरीब जनतेला दरवर्षीप्रमाणे मोफत साखर वाटप होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
वर्ष 16 वे
दि. – 07/11/2026
वेळ – सायंकाळी पाच वाजता
ठिकाण – लक्ष्मी आई मंदिर तोंडले.
आयोजक – श्री. संताजी सुखदेव निकम
माजी उपसरपंच तोंडले
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



