चोपडज येथे कृषी विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम

चोपडज (बारामती झटका)
बारामती तालुक्यातील चोपडज येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषीचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रम राबविणार आहेत. या निमित्ताने चोपडज गावामध्ये विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम हा कृषी पदवी अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत गावामध्ये वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. या काळात ते आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक नियोजन, मृदा परीक्षण, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, एकात्मिक पीक संरक्षण, शासकीय कृषी योजना, कृषीपूरक उद्योग तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच शेती व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊन शेतीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यावर शास्त्रीय उपाययोजना सुचविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व गावाच्या कृषी विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात यज्ञेश पाडवी, अनंतरूप माने, उदय दुडे, ओम पाटे, अपूर्व चव्हाण, राजवर्धन चौधरी आणि सूरज निंभोरे या कृषी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



