नागपंचमीनिमित्त वेळापूरात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ; विविध स्पर्धांचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)
नागपंचमी सणाचे औचित्य साधून श्री महादेव देवस्थान देवालय ट्रस्ट, वेळापूर यांच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसह शालेय विद्यार्थिनींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी या उपक्रमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून महादेव देवस्थान देवालय ट्रस्ट, भक्तनिवास, वेळापूर येथे विविध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये रांगोळी, मेहंदी आणि फॅन्सी ड्रेस (वेशभूषा) या स्पर्धांचा समावेश आहे.
तसेच १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजल्यापासून संगीत खुर्ची, उखाणे आणि फनी गेम्स या मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धांमध्ये गट क्रमांकानुसार सहभागी होता येणार असून, शालेय विद्यार्थिनी, मुली तसेच विवाहित महिलांसाठी स्वतंत्र सहभागाची संधी देण्यात आली आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी व मुलींनी मोठ्या संख्येने नोंदणी करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक स्पर्धेतून उत्कृष्ट तीन क्रमांक निवडण्यात येणार असून, विजेत्यांना कार्यक्रमानंतर बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र, वेळापूर महिला व सर्व महिला बचत गट, वेळापूर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. श्री महादेव देवस्थान देवालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अमृतराज सूर्यकांत माने देशमुख यांनी या उपक्रमात महिलांनी व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



