नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी

माजी आमदार बबनराव शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
माढा (बारामती झटका)
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित आणि नंतर टप्प्याटप्प्याने 100 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या विविध माध्यमांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 26 हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी अशी मागणी माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रितसर जाहिरात प्रसिद्ध करून शैक्षणिक अर्हताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन व शिक्षण विभागाने मंजुरी देऊन त्यांना विनाअनुदानित, अंशतः अनुदानित संस्थेत नियुक्ती दिली आहे.
शासनाच्या टप्पा अनुदान धोरणानुसार 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ, विविध शिक्षक संघटना व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सनदशीर लोकशाहीच्या मार्गाने संप, आंदोलन, मोर्चे काढले आहेत. वेळोवेळी शासनाकडे विनंती व पाठपुरावा केला आहे.
राज्यातील 26 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अत्यंत ज्वलंत व जिव्हाळ्याच्या प्रश्नाचा शासनाने गांभीर्याने विचार करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत योग्य ती पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे.
शासन जाणीवपूर्वक माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यास टाळाटाळ व वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे शासनाने 2005 पूर्वी नियुक्त प्राथमिक शिक्षक व इतर सर्व खात्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे आणि दुसरीकडे मात्र माध्यमिक शिक्षकांना वेगळा न्याय ही शासनाची दुटप्पी व अन्यायकारक भूमिका आहे त्यामुळे शासनाने भेदाभेद न करता रितसर जाहिरात प्रसिद्ध करून शिक्षण विभागाने मंजुरी देऊन कार्यरत असलेल्या राज्यातील 26 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शिक्षकांनी दिला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



