राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थांचा व्यक्तीमत्व विकास घडतो – डाॅ. बाळासाहेब मुळीक

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रसिद्धी सप्ताह अंतर्गत उद्धबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. बाळासाहेब मुळीक बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. मुळीक म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने कार्यरत असतो. या विभागात वर्षभरात अनेक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आरोग्य विषयक जागरूकता, पर्यावरण विषयक जागृती समाजाभिमुखता, संवेदनशीलता, सहनशक्ती याचबरोबर श्रमाविषयी प्रतिष्ठा निर्माण केली जाते. त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणला जातो. त्यांनी आपल्या व्याख्यानामधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाची संकल्पना स्पष्ट केली.

यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. डी. एस. बागडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सहभाग घ्यावा व स्वतःचा विकास साधावा. राष्ट्रीय सेवा योजना विभागात तयार झालेले विद्यार्थी हेच आज समाजाचे नेतृत्व करीत असलेले आपणास पाहावयास मिळतील. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेमधूनच विद्यार्थ्यांना मिळत असते. म्हणून वर्षभर राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने व सकारात्मकतेने सहभागी व्हावे.
यावेळी “माझी माती माझा देश” या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून आणलेली माती अमृत कलशांमध्ये एकत्र करण्यात आली. यामधून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व आपल्या मातीविषयी संवेदना जागृत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. सज्जन पवार यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. स्मिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील १७० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng