द ग्रेट गोरे ! महापालिकेनंतर झेडपी वर भाजपची मुसंडी, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने एक हाती वर्चस्व राखल्यानंतर सर्वांचे लक्ष होते ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या निकालाकडे… इथेही भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमताच्या जवळ गेल्याने भाजपने जिल्ह्यात सुद्धा मुसंडी मारत झेडपीची सत्ता ताब्यात घेतली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर आता पूर्णपणे शिक्कामोर्तब झाल्याचे पाहायला मिळते.
नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या काहीशा अपयशानंतर सर्वांचे लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे होते परंतु, परफेक्ट नियोजनबद्ध आणि अतिशय आत्मविश्वासाने पालकमंत्री जयकुमार गोरे हे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले. सोबतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना घेऊन त्यांनी 102 पैकी तब्बल 87 जागा भारतीय जनता पार्टीला मिळवत एक हाती वर्चस्व राखले.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तशी सोपी नव्हती. अकरापैकी सहा आमदार हे विरोधात आहेत. तरीही भारतीय जनता पार्टी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेली.

अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी, दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख, उत्तरमध्ये माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, मोहोळमध्ये राजन पाटील, यशवंत माने, माळशिरस मध्ये माजी आमदार राम सातपुते, पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे, सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील, माढ्यात रणजितसिंह शिंदे, करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे, बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंग केदार यांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी ही निवडणूक हाताळली.
राज्याच्या ग्रामविकास विभागाचा कारभार करत पालकमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्याकडे जातीने लक्ष दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील आपल्या सभा कॅन्सल केल्या. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आली. सर्वप्रथम शत्यांनी सभा घेतल्या. कुठेही आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमतरता त्यांनी भासू दिली नाही.
सोमवारी जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले. भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारली आहे. या निकालावरून भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारली असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर सुद्धा या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



