पुणे विभागीय जीएसटी समितीवर बारामतीचे धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांची फेर निवड

बारामती (बारामती झटका)
वस्तू व सेवाकर विभागाच्या पुणे विभागांतर्गत ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीवर (Grievance Redressal Committee Pune Zone) सदस्य म्हणून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी व बारामती मर्चंट असोसिएशनचे सचिव निलेश दोशी यांची पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आलेली असलेचे केंद्रीय जीएसटीचे उप आयुक्त धिरज मोरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
केंद्रीय वस्तू व सेवाकर पुणे मुख्य आयुक्त निरज कंसल (आय आर एस) व राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा (आय ए एस) यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करण्यात आली असून बारामतीतील धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर येथील उद्योग व व्यावसाईक प्रतिनिधी, पुणे विभागातील चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, कंपनी सेक्रेटरी, कस्टम हाऊस, खाद्यतेल, व्यापारी महासंघ, टाटा मोटर्स आदींचे प्रतिनिधी व जीएसटी विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यांचा समितीत समावेश करण्यात आलेला आहे.
केंद्रीय जीएसटी अंतर्गत पुणे-१, पुणे-२ व कोल्हापूर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र या समितीच्या कार्यकक्षेत असणार आहे.
जीएसटी करदात्यांचे सर्व प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवणे, प्रक्रियेतील अडथळे व सॉफ्टवेअर संबंधी विशिष्ट अथवा सार्वजनिक समस्यांचे निवारण, जीएसटी करदात्यांना जाचक ठरणारे कायदे, नियमअटी, परिपत्रके बाबत जीएसटी कौन्सिल सचिवालय व सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेसच्या धोरण विभागाच्या निदर्शनास आणून त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे आदी महत्त्वाचे कामकाज ही विभागीय समिती करत असते.

२०१७ साली जीएसटी लागू केल्यापासून आजतागायत ही करप्रणाली व तिच्या अंमलबजावणी बाबत अनेक समस्या व संभ्रम असून करदात्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यात सुलभता आणणे आवश्यक असलेने बारामती परिसरातील जीएसटी करदात्यांनी आपले प्रश्न व सूचना अवश्य कळवावेत, ते सोडवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आवाहन धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



