नातेपुते पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पुणे येथून महिला आरोपिकडुन, मुद्देमाल हस्तगत

नातेपुते येथील मंगल कार्यालयातील सोन्याच्या दागिन्याची चोरी उघड…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात लग्नाच्या गडबडीत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्याला नातेपुते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे येथून अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले तब्बल ३ लाख ९८ हजार ७५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ मे २०२६ रोजी नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात विवाहासह साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वर कक्षात साखरपुड्याच्या तयारीमध्ये नातेवाईक व्यस्त असताना फिर्यादी हर्षवर्धन रामचंद्र ठोंबरे यांच्या आईच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत नातेपुते पोलीस ठाणे गुरनं २१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणें गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा पुढील तपास पोना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत.
तपासा दरम्यान असे दिसून आले की, आरोपी महिला मंगल कार्यालयातील गर्दीचा आणि लग्नाच्या गडबडीचा फायदा घेते. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक साखरपुड्याच्या तयारीमध्ये किंवा फोटो काढण्यात व्यस्त आहेत का, याचे ती बारकाईने निरीक्षण करते. त्यानंतर, संधी मिळताच अतिशय शिताफीने पर्सची चैन उघडून दागिने चोरून, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ती तिथून पसार होते.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीचे (Technical Surveillance) विश्लेषण करत असताना, सदरचा गुन्हा जयश्री विलास दगडे (वय ३५, रा. खुळेवाडी, पुणे, मुळ रा. शेलगाव, ता. करमाळा, जि सोलापूर) व धनंजय दशरथ पवार (वय ४०, रा. खुळेवाडी, पुणे, मुळ रा. अंतरवली, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने पुणे येथे सापळा रचून आरोपी महिलेला व तिचा साथीदार यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून, महिला आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढगळे (सहा पोलीस अधिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर, पोसई सोनल मोरे, सहा. पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस अंमलदार रणजीत मदने, महिला पोलीस अंमलदार सिमा सोनवणे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी तसेच पोकॉ/२७७८ हरिप्रसाद पुंडे, पोकॉ/९९२५ लालू क-हे विमानतळ पोलीस ठाणे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



