मुंबई–पुणे मिसिंग लिंक व नीरा नदीवरील पुलांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी

पुणे (बारामती झटका)
मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प तसेच उजनी धरण परिसरातील आणि नीरा नदीवरील पुलांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ही मागणी डॉ. अभिषेक बोके यांच्या संकल्पनेतून पुढे आली असून यासंदर्भात राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले आहे. सदरचे निवेदन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र महाराज भोसले यांना देण्यात आले आहे.
हे निवेदन सोमनाथ लोहार (अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र विभाग), डॉ. मारुती आवरगंड (प्रदेश समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि केशव माने (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यात शोककळा पसरली असून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः मुंबई–पुणे मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या दळणवळण व्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरणार असून या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच उजनी धरणावरील शिरसोडी (ता. इंदापूर, जि. पुणे) ते कुंगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील नीरा नदीवरील पुलासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुलामुळे इंदापूर (पुणे) आणि माळशिरस (सोलापूर) तालुक्यांमधील दळणवळण अधिक सुलभ झाले असून स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

वरील सर्व विकासकामांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान लक्षात घेऊन संबंधित प्रकल्प व पुलांना त्यांचे नाव देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



