महात्मा बसवेश्वर आणि अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लिंगायत माळी परिवाराचा सांगली, वांगी मध्ये होणार 26 मे रोजी सत्यशोधक विवाह !!!

सांगली (बारामती झटका)
फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणेचे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र व सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्रातर्फे महात्मा बसवेश्वर यांची 891वी आणि अहिल्याराणी होळकर यांची 300 वी जयंतीनिमित्त व आवर्जून आठवण म्हणून समाजसेवक सहदेव धोंडीबा माळी, मालगाव यांची सत्यशोधिका पूनम माळी हिचा वाढदिवस दिन हाच शुभ मुहूर्त म्हणून सोमवार दि. 26 मे 2025 रोजी दु. 12.30 वा. कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम माळी, वांगी यांचे सत्यशोधक विजय माळी यांच्यासोबत महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने मोफत होणार आहे.
सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्रच्या प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या विनंतीवरून या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधीकार्य पार पाडणार आहेत. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुदाम धाडगे व हनुमंत टिळेकर महात्मा फुले रचित मंगलाष्टकांचे गायन करणार आहेत. आणि प्रा. पांडुरंग गाडेकर हे भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करणार आहेत. यावेळी वधू-वरांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या शुभहस्ते भेट म्हणून देण्यात येणार आहे. तर वधू-वरांचे आई-वडील व मामा-मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

या विवाहाप्रसंगी सभामंडपात भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात धरून फुलांच्या पायघड्यावरून वधूवर पूनम व विजय यांचे आगमन होणार असून त्यांच्या शुभहस्ते प्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर आई-वडील, मामा-मामी व इतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, अहिल्याराणी होळकर, शिव-शाहू-आंबेडकर व इतर महापुरुषांच्या फोटोंना हार अपर्ण करून राष्ट्रीय ग्रंथाचे पूजन केले जाणार आहे. यावेळी मंचावर धन-धान्याचे पूजन आणि विवाहाची आठवण म्हणून फळझाडाचे वृक्षारोपण केले जाणार आहे. तर आलेल्या सर्व मान्यवरांना महापुरुषांचे ग्रंथ भेट दिले जाणार आहेत. तसेच या विवाहाप्रसंगी अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती या ऐतहासिक सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजक परशुराम माळी यांनी दिली. तर शेतकरी संघटनेचे व सत्यशोधक विद्रोही चळवळीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत असे देखील म्हंटले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.