ताज्या बातम्यासामाजिक

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी ग्रामपंचायत विभागाची प्रतिमा मलिन केली….

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन नावातच कुशल असल्याने कायम खुशाल असतात…

पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास खाते असल्याने जिल्हा परिषद सोलापूरची झाडाझडती घेणे गरजेचे आहे….

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या नावातच कुशल असल्याने कायम जिल्हा परिषद मध्ये खुशाल असतात. याचाच फायदा घेऊन जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यकांत भुजबळ यांनी ग्रामपंचायत विभागाची प्रतिमा मलीन केलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे कॅबिनेट मंत्री असल्याने जिल्हा परिषद सोलापूरची झाडाझडती घेणे गरजेचे आहे, अशी पीडित व सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे…

तक्रारदार श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी दि. 03/06/2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनंतर सदरची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली होती. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांना चौकशी अहवालासह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार माळशिरस पंचायत समितीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन मधील ट्रायसिकल खरेदी (कचरा गाड्या) खरेदी केलेल्या 14 ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी खरेदीमध्ये संशयित अपहार व आर्थिक अनिमित्त केलेली आहे. त्यासंबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग माळशिरस येथील पाणीपुरवठा उपअभियंता हेही जबाबदार आहेत. तसेच 15 ग्रामपंचायतीचे मूल्यांकनापेक्षा ज्यादा खर्चास मान्यता घेऊन आर्थिक अनिमित्त केल्याचे दिसून येते असा अहवाल डॉ. आबासाहेब पवार तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी दिलेला आहे..

चौकशी अहवाल अभिप्राय जिल्हा परिषद कडे प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांची तक्रारदार यांनी भेट घेतल्यानंतर प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचे खुलासे मागविलेले होते..

दरम्यानच्या काळामध्ये श्री. कुलदीप जंगम यांची बदली होऊन श्री. कुशल जैन त्यांच्या जागी आले तर प्रभारी असणाऱ्या स्मिता पाटील यांच्या जागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. सूर्यकांत भुजबळ यांची अतिरिक्त पदी नियुक्ती होऊन त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाचा पदभार आला.

तक्रारदार श्रीनिवास कदम पाटील यांनी श्री. सूर्यकांत भुजबळ यांची जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य सांगितले परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक चौकशी अभिप्राय अहवालाकडे दुर्लक्ष करून दुसरीच कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात करून संबंधित अधिकारी यांच्याशी आर्थिक मिलीभगत करून प्रकरण जाणीवपूर्वक कसे लांबविले जाईल याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

चौकशी अहवालामध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत कि,
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक अपना 10 11 प्रक्र ८७ पाणीपुरवठा 15 मंत्रालय मुंबई दि. 13/4/2011 व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक अपना 222 प्रक्र 292 पाणीपुरवठा 15 दि. 30 सप्टेंबर 2024 मधील दिलेल्या सूचनांचे व तरतुदीचे सदर ट्रायसिकल खरेदी करताना कोणत्याही निकषाचे पालन झालेले नाही.

तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांनी आणि तत्कालीन उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माळशिरस यांनी जादा खर्च नोंदवलेला असताना त्यास खर्चात मान्यता दिलेली आहे. सदरचा अपहार व आर्थिक अनियमितता आहे. 29 पैकी 15 ग्रामपंचायतीने ट्रायसिकलवर खर्च करण्यासाठी मूल्यांकना पेक्षा जादा खर्चास मान्यता घेतली आहे. विशेष बाब म्हणजे कागदोपत्री ट्रायसिकल खरेदी केली आहे. परंतु, सध्या सदर खरेदी केलेली नमूद कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही. खरेदी केली नाही परंतु, खर्च मात्र केलेला आहे. याबाबत संभाव्य आर्थिक अनियमितता व संभाव्य अपहारास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, मूल्यांकन करणारे अभियंता व खर्चास मान्यता देणारे उपअभियंता व गटविकास अधिकारी हे सर्वजण जबाबदार आहेत. अंदाजपत्रकात उपांग असलेल्या ट्रायसिकलवर तरतुदीपेक्षा ज्यादा रकमेची तांत्रिक मान्यतेशिवाय अनावश्यकपणे मोजमाप व जादा मूल्यांकन करणारे ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता हे विशेषकरून सदर अनियमिततेसाठी दोषी आढळून येतात. सर्व ट्रायसिकल खरेदीसाठी GEM जीईएम पोर्टल वरील कार्यपद्धतीने खरेदी करणे बाबत प्रशासकीय मान्यतेमध्ये स्पष्ट सूचना आहेत. ग्रामपंचायतीने जीईएम पोर्टलवरून खरेदी केलेले आहे. तथापि खरेदी केलेल्या साहित्याशी स्पेशीफिकेशन जुळून येत नाही.

ग्रामपंचायतीने आकृतीबंधात वाहन चालक हे पद नाही तसेच ग्रामपंचायत स्तरावर वाहन चालकाचे नेमणूक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने झालेली नाही. तसेच ज्या ग्रामपंचायतीने वाहन खरेदी केलेले आहे त्या वाहनाचे आरटीओ पासिंग न करता संबंधित ठेकेदाराकडून ताबा पावतीद्वारे वाहने ताब्यात घेतले आहेत, ही बाब बेकायदेशीर आहे असा स्पष्ट चौकशी अहवाल आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम व तत्कालीन प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. सूर्यकांत भुजबळ यांनी ठोस कार्यवाही केली असती तर जिल्हा परिषद कामकाजामध्ये पारदर्शकता येऊन सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची जिल्हा परिषद लोकाभिमुख झाली असती. मात्र कुशल जैन नावाप्रमाणे खुशाल असल्याने याचाच गैरफायदा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यकांत भुजबळ पदाचा गैरवापर करून सोलापूर जिल्हा परिषद मधील ग्रामपंचायत विभागाची प्रतिमा मलिन केलेली आहे..

सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामपंचायत विभागामार्फत अनेक कामे सुरू आहेत. घरकुल योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये सोलापूर जिल्हा सर्वात शेवटी असून राज्याचा विचार करता प्रत्येक कामकाजामध्ये जिल्हा परिषद सोलापूर मागे असल्याचे चर्चिले जात आहे. श्री. भुजबळ हे जिल्हा परिषद सोलापूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कामकाजाबाबत विशेषतः ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वैयक्तिक सेवेच्या गोष्टीबाबत कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा करीत नाहीत. तसेच वैयक्तिक कामासाठी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे.

सदर बाबतीत बारामती झटका यूट्यूब चैनल चे संपादक श्री. श्रीनिवास कदम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे साहेब तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. सदर तक्रारीचे निवारण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे नमूद केलेले आहे. क्रमशः

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button