मराठा तरुणांच्या स्वप्नांना मिळणार बळ! महामंडळ आणि मराठा महासंघाच्या पुढाकाराने ‘बँक ऑफ इंडिया, भोसे’ येथे सकारात्मक चर्चा

मंगळवेढा (बारामती झटका)
मराठा समाजातील तरुण उद्योजक बनावा आणि त्याला हक्काचे आर्थिक पाठबळ मिळावे, या उदात्त हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सरसावले आहेत. आज मंगळवेढ्यातील बँक ऑफ इंडिया, भोसे शाखेत महामंडळाचे अधिकारी आणि मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कर्ज प्रकरणांबाबत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पण आग्रही चर्चा केली.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. सौरभ मगर साहेब आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. “आपला तरुण व्यवसायात उतरतोय, त्याला बँकेने मायेचा हात द्यावा,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बँकेतील प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करताना, तरुणांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील, यावर भर देण्यात आला. महामंडळाचे अधिकारी सौरभ मगर यांनी तांत्रिक बाबी समजून सांगत तरुणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन डोरले, शहराध्यक्ष अमोल सातपुते, शाखा अध्यक्ष अमोल सूर्यवंशी यांनी तरुणांच्या बाजूने आपली मते मांडली. तसेच नंदीश्वर भोसे येथील पदाधिकारी रोहित सूर्यवंशी, सुमित कदम, पांडुरंग आवळेकर, अजय सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, शहाजी सूर्यवंशी, विनायक आसबे यांनी उपस्थित राहून या मोहिमेला पाठबळ दिले.

“आमचा उद्देश बँकेला सहकार्य करणे आणि तरुणांना न्याय मिळवून देणे हाच आहे. सर्वांच्या समन्वयातून तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा तरुण उद्योजक व्हावेत, हीच आमची इच्छा आहे.” – सौरभ मगर (अण्णासाहेब पाटील महामंडळ जिल्हा समन्वयक सोलापूर ) व अर्जुन चव्हाण (अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष)
बँकेचा सकारात्मक प्रतिसाद:
बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने देखील या भेटीचे स्वागत केले असून, मराठा समाजातील तरुणांचे प्रस्ताव प्राधान्याने आणि वेळेत निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. या संवादामुळे अनेक तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



