ताज्या बातम्यासामाजिक

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे श्री क्षेत्र वश्या मारुती पर्यटन स्थळास लवकरच भेट देणार…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून मंदिर परिसर सुशोभित व विकसित होऊन पर्यटन स्थळ बनलेले आहे…

सदाशिवनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ लवकरच श्रीक्षेत्र वश्या मारुती पर्यटन स्थळास भेट देणार आहेत. श्री क्षेत्र वश्या मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग चोपडे, सचिव गजानन गोरे, ज्ञानदेव गोरे, दादासो बोराटे, किरण गोरे, डॉ. अनिल गोरे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कमलकुंज निवासस्थानी भेट घेऊन श्रीक्षेत्र वश्या मारुती पर्यटन क्षेत्राला आपण भेट द्यावी, असा आग्रह केल्यानंतर पालकमंत्री यांनी श्री वश्या मारुती पर्यटन स्थळास भेट देऊन हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याचे आश्वासित केले. यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक शरद बापू मोरे, फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष सुनील गोरे, संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मारकडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामसिदवाडी व सदाशिवनगर गावांच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे. त्याची ओळख वश्या मारुती म्हणून आहे. हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती मंदिर परिसर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभित व विकसित होऊन विकासकामांना गती मिळालेली आहे. पर्यटन स्थळ म्हणून पर्यटक व हनुमान भक्त यांचे श्रद्धास्थान बनलेले आहे.

मारकडवाडी व तामसिदवाडी गावच्या सरहद्दीवर गोरेवस्ती हनुमान नगर येथे स्वयंभू जागृत मारुती मंदिराचे स्थान आहे‌. गोरे वस्ती व आसपासच्या भाविकभक्तांनी मंदिराचे भव्य शिखर व सभामंडप स्वखर्चाने लोकवर्गणीतून बांधले आहे. आकर्षक शिखर डिझाईन, मंडपाचे डेरेदार बांधकाम आणि मारुतीचे पावित्र्य या सर्व गोष्टी गोरे वस्ती येथील हनुमान भक्त मनापासून करत आहेत. या मंदिरात वर्षातून दोन-तीन वेळा मोठे उत्सव असतात. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले जाते.

वश्या मारुती मंदिराच्या आसपास बाजूने ओढा व समोरच्या बाजूला गायरान जागा आहे. वश्या मारुती परिसर निसर्गरम्य ठिकाण आहे. सदरच्या जागेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी 3333 वृक्षांची लागवड करून मंदिर परिसर सुशोभीकरण व विकसित करण्यास वृक्षारोपणाने सुरुवात केली. मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी कठडे बांधले आहेत. संरक्षक भिंत बांधलेली आहे‌. उजेडासाठी हायमास्ट दिवा आहे. भाविकांना मंदिराच्या समोर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद घेण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत.

दिवसेंदिवस भाविकांची वश्या मारुतीविषयी श्रद्धा वाढत आहे. शनिवारी व इतर वारी सुद्धा आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असतात. निसर्गरम्य मंदिर परिसर असल्याने पर्यटन ठिकाणाची वाटचाल सुरू आहे. वश्या मारुती मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचे काम सुरू आहे.

धार्मिक उपक्रम व पर्यटक यांच्यासाठी मंदिर परिसरात 80 बाय 100 व 70 बाय 100 असे दोन भव्य सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भक्त मंडपाच्या दोन्ही बाजूला वातानुकूलित भक्त निवास तयार करण्यात येणार आहे. लग्न समारंभ सुद्धा सदरच्या भव्य हॉलमध्ये होऊ शकतात. मारुतीचे धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे‌. निसर्गरम्य ठिकाण असल्याने मंदिर विकास परिसर करीत असताना मंदिराच्या पाठीमागे ओढ्यावर बंधारा आहे‌. सदर ठिकाणी बोटिंग सुरू करून घाट बांधण्यात आलेला आहे. लहान मुलांना खेळणी तयार करून बालोद्यान केले आहे.

आसपासच्या भागातून मारुतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर उभारण्यात आलेले आहे. मंदिराच्या समोर स्ट्रीट लाईट उभारून दोन्ही बाजूनी विस्तृत असे डांबरी रस्ते करण्यात आलेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य कमान उभारण्यात आलेली आहे. दळणवळणाची सुविधा, रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. माळशिरस तालुक्यात पर्यटन स्थळांमध्ये वश्या मारुतीचे मंदिर तयार झालेले आहे.

अशा पद्धतीने मंदिर सुशोभित व विकसित करण्याचे काम सुरू आहे. गोरे वस्ती वरील सर्व बागायतदार, शेतकरी, कामगार व मोलमजुरी करणारे यांनी सुद्धा आपापल्यापरीने मंदिर कळस व सभामंडप बांधण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. सर्व धार्मिक उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असतो. गोरे वस्ती येथील हनुमान भक्तांच्या सहकार्यामुळे मंदिर उभा राहिलेले आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामांना गती मिळालेली आहे‌. हनुमान भक्त हरिभाऊ पालवे यांचा पाठपुरावा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून व सहकार्यातून सुरू आहे. हनुमान भक्तांच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना पूर्ण होतील, असा हनुमान भक्तांना आशावाद आहे. लवकरच वश्या मारुती पर्यटकांचे व भाविकांचे श्रद्धास्थान ठरणाऱ्या श्रीक्षेत्र वश्या मारुती पर्यटन स्थळास पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट होणार असल्याने हनुमान भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button