ताज्या बातम्याराजकारण

पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला सुचक होते. परंतु, त्यांनीच या उमेदवारावर हरकत घेत सूचक म्हणून आपली सही नाही त्यामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत गेम झाला.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी ही विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भारतीय जनता पार्टी कडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पालकमंत्री गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन केल्याचे पाहायला मिळत आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते ते या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीकडे. प्रथमच विधान परिषदेची जागा काँग्रेसला सुटल्याने पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी सूचक म्हणून मतदारांपैकी दहा सदस्यांची सही लागते. दरम्यान फत्तेपुरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेले पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनीच फत्तेपुरकर यांच्या अर्जावर हरकत घेत यातील सही माझी नाही असे म्हणून त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

सकाळी अकराच्या दरम्यान नागेश भोसले हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे असे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

माहिती घेतली असता समजले की, पालकमंत्री जयकुमार गोरे हे सकाळी 11 वाजता सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये बसून सकाळची सूत्र हलवली. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे हे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह ठाण मांडून होते. दुपार नंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने ही नेतेमंडळी शहाजी भाऊ पवार यांच्या यमाई कंट्रक्शन मध्ये बसून या निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांची भेट घेतल्याचे दिसून आले. दुपारी दीड वाजल्यापासून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उमेदवार फत्तेपूरकर हे रात्रीच्या आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून होते.

रात्री आठच्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेएन यांनी आपला निकाल दिला. या निकालात रमेश बारस्कर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर घेतलेल्या चारही हरकती फेटाळण्यात आल्या. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर नागेश भोसले यांनी घेतलेली हरकत मान्य करून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी फत्तेपुरकर यांचा अर्ज रद्द ठरवला आहे. त्याचबरोबर न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार वाघमोडे यांचाही अर्ज बाद करण्यात आला आहे. आता राहिलेल्या दोन दिवसात कोण कोण माघार घेणार आणि भारतीय जनता पार्टी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button