भांबुर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ‘सरकार प्रतिष्ठान’ आक्रमक

माळशिरस (बारामती झटका)
भांबुर्डी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे चालला असून, प्रशासक आणि ग्रामसेविका यांच्या ढिसाळ व निष्क्रिय धोरणामुळे गावाचा पुरता बोजवारा उडाला आहे. “गावात ग्रामपंचायत प्रशासन नक्की अस्तित्वात आहे की त्याचे फक्त कागदावरच अस्तित्व उरले आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सरकार प्रतिष्ठान भांबुर्डी’ या संघटनेने आक्रमक पवित्रा घेत माळशिरसच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) एक निवेदन देऊन प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. येत्या ८ दिवसांत येथील भ्रष्ट, कामचुकार, आणि हुकूमशाही कारभाराला चाप न लावल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा प्रतिष्ठानने दिला आहे.
दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत प्रशासनाने १० वर्षांतील विकासकामांत लाखो रुपये खर्च केले पण, नागरिक बेहाल आहेत. जी विकास कामे केली त्या विकासकामांचा नागरिकांना लाभ मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती अधिकारात विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे
सन २०१५ ते २०२६ या अकरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत गावात झालेल्या कथित विकासकामे शासकीय नियमांना हरताळ फासून “विकासकामे कागदावर आणि निधी मात्र खात्यावर” अशी थेट दरोडेखोरी सुरू असल्याचा संशय व्यक्त करत, या सर्व कामांची आणि खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनता तहानलेली, पाणी योजना कागदावर अशी अवस्था गावात निर्माण झाली. उन्हाळ्याच्या दिवसांत गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. गावाला कायमस्वरूपी पिण्याचे व वापराचे शुद्ध पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
भांबुर्डी गावातील हायमास्ट दिवे बंद अवस्थेत धूळ खात पडले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील वाड्यावर व गावठाण मध्ये दिवाबत्तीची सोय नाही.
गावात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, प्रशासनाला नियमित फवारणी करण्याचेही भान राहिलेले नाही. ‘मॅडम’ मुख्यालयी गायब असून कर्मचारीही कामचुकार आहेत. गावाच्या मुख्य कारभारी असलेल्या ग्रामसेविका मॅडम शासकीय नियमांचे उल्लंघन करून मुख्यालयी (हेडक्वार्टर) राहतच नाहीत. संगणक चालक (ऑपरेटर) व इतर कर्मचारी कधीच वेळेवर येत नाहीत आणि पूर्ण वेळ थांबतही नाहीत. यामुळे दाखले आणि कामांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
ग्रामपंचायतीची अनेक वर्षांपासूनची मालमत्ता कराची लाखो रुपयांची मोठी रक्कम थकीत आहे. ही वसुली करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून, यामुळे गावाचा हक्काचा विकास निधी रखडला आहे. या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
“भांबुर्डी ग्रामपंचायतीमधील हा सावळागोंधळ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. शासकीय वस्तू आणि यंत्रसामग्री खरेदीच्या नावाखाली झालेल्या बिलांची चौकशी झालीच पाहिजे. येत्या ८ दिवसांच्या आत या सर्व बाबींवर प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत, तर शासन व प्रशासनाच्या विरोधात माळशिरस पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन केले जाईल,” असा स्पष्ट आणि कडक इशारा सरकार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.
सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रसाद मल्हारी गेंड यांच्या मार्गदर्शनानुसार व चेअरमन श्री. अजित तुळशीराम वाघमोडे, कार्याध्यक्ष प्रा. विजय वसंत गेंड, उपाध्यक्ष श्री. युवराज रामचंद्र केसकर, श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ गेंड श्री. अर्जुन शामराव नरळे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



