शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पैठण तालुका प्रमुखपदी देविदास (राजू) बोंबले यांची नियुक्ती

पैठण (बारामती झटका)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देविदास (राजू) रावसाहेब बोंबले यांची पैठण तालुका प्रमुख म्हणून सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक-अध्यक्ष मंगेश नरसिंह चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, त्याबाबतचे नियुक्तीपत्र १ जुलै २०२६ रोजी देण्यात आले आहे.

नियुक्तीनंतर बोंबले यांच्यावर पैठण तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमधील १० टक्के राखीव खाटांचा लाभ मिळवून देणे, निकषांनुसार मोफत अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना उपचाराचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय, गंभीर व खर्चिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी विविध निधी व संस्थांच्या माध्यमातून सहाय्य मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यालयाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत.

देविदास (राजू) बोंबले यांच्या नियुक्तीमुळे पैठण तालुक्यातील गरजू रुग्णांना शासकीय योजना व वैद्यकीय मदतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



