ताज्या बातम्यासामाजिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा परिणाम: “पिवळी जिलेबी” झाली “पांढरी”! भेसळीला चाप

कलरयुक्त बेकरी पदार्थ, भेसळयुक्त दूध आणि गुटख्यावर FDA ची करडी नजर; नागरिकांकडून समाधान व्यक्त

माळशिरस (बारामती झटका)

महायुती सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी श्री. तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केल्यानंतर राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळीला मोठा आळा बसला आहे. त्यांच्या करडी नजर आणि धडक कारवाईच्या धास्तीने बाजारातील “पिवळी जिलेबी” आता “पांढरी” झाल्याचे चित्र दिसत आहे.

कलरला रामराम, नैसर्गिक रंगाला होकार
पूर्वी स्वीट होम आणि बेकरीतील पदार्थांना आकर्षक दिसण्यासाठी पिवळा आणि इतर बेकायदेशीर कलरचा सर्रास वापर केला जायचा. त्यामुळे जिलेबी, मिठाई आणि इतर पदार्थांना एक वेगळीच चकाकी असायची. आयुक्त मुंढे यांनी कलरचा वापर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यावर कठोर भूमिका घेतली.

त्यामुळेच आता बाजारात मिळणारी जिलेबी नैसर्गिक पांढऱ्या-पिवळ्या रंगात दिसत आहे. चव तीच आहे, पण कलर नाही. पांढरी जिलेबी पाहून “ही जुनी आहे का?” किंवा “उन्हामुळे फिकी पडली आहे का?” अशी शंका ग्राहकांना येत आहे. सोबत जोडलेल्या फोटोमध्येही हाच बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.

भेसळ दूध आणि गुटख्यावरही कारवाई
केवळ जिलेबीच नाही तर भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरही FDA ने मोठी मोहीम हाती घेतली आहे. घातक रसायनांपासून तयार केलेले दूध लहान मुले, रुग्ण आणि वयोवृद्धांना दिले जात होते. अशा रॅकेट्सवर धडक कारवाई सुरू झाल्याने भेसळखोरांमध्ये दहशत आहे.

त्याचबरोबर गुटखा, मावा यासारख्या अमली पदार्थांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. हॉटेल्स आणि चायनीज गाड्यांवर खाण्यानंतर हाताला रंग लागण्याची जी सवय होती, तीही आता बंद झाली आहे. जेवणानंतर हात स्वच्छ राहत असल्याने ग्राहक समाधानी आहेत.

शेतकरी आणि नागरिक दोघेही आनंदी
या कारवाईचा दुहेरी फायदा झाला आहे. एकीकडे भेसळ दूध बंद झाल्याने दुधाला चांगला भाव मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी बांधव आनंदी आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुरक्षित झाल्याने सर्वसामान्य नागरिकही समाधानी आहेत.

एकूणच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात “जे दिसतंय तेच खरं आणि जे खातोय ते शुद्ध” अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button