मोहिते पाटील यांनी दिलेलं सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवरत्न सभागृह नाव हटविले….

सोलापूर जिल्हा परिषदेचे ‘शिवरत्न सभागृह’ ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ नामकरणाचा ठराव; झेडपी करणार ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा
सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष तथा सभापती दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात झाली. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देतानाच गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या चर्चेत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा सुरक्षित साठा करण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाला ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सादर केला.
यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. कामांची गुणवत्ता, निधीचा योग्य वापर आणि पारदर्शकता याबाबत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २५ जून २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून नोंद घेण्यात आली.
बैठकीस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज माने, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे आणि रमेश श्रीमंत भांजे आदी उपस्थित होते.
प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा सदस्य सचिव सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



