महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी इंग्लिश शिक्षण संस्थाना माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत लागू करण्याची शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)
शिक्षण हा प्रत्येक बालकांचा मूलभूत अधिकार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यावश्यक आहे. मात्र सध्या महाराष्ट्र राज्यात खासगी शिक्षण संस्था व खाजगी इंग्लिश शाळांमध्ये होत असलेली फी दरवाढ ही चिंतेचा विषय ठरत आहे. दरवर्षी कोणतेही ठोस कारण न देता शाळांच्या शुल्कात मोठी वाढ होत आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांवर आर्थिक ओझं वाढत आहे. आज अनेक शाळा शिक्षण देण्याबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत. प्रवेश शुल्क, संगणक शुल्क, स्मार्ट क्लास शुल्क, वाहन सुविधा शुल्क, इमारतीसाठी निधी इत्यादी विविध नावांनी पालकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाते. अनेक वेळा या शुल्कवाढीबाबत पालकांना योग्य माहिती दिली जात नाही आणि तक्रार केली तरी ती ऐकली जात नाही. शाळा प्रशासनाने जर कोणतीही फी वाढ करायची असेल, तर ती पारदर्शक पद्धतीने करावी. पालकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सल्लामसलत करून निर्णय घेणं गरजेचं आहे. तसेच शासनानेही अशा शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. फी दरवाढीमुळे काही पालक मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न गमावतात. त्यामुळे ही बाब केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक विषमतेचं कारण ठरू शकते. शिक्षण हे मूलभूत हक्क असून त्यावर कुणीही व्यवसाय करू नये, ही भावना समाजात रुजवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
शाळांमधील फी दरवाढ ही एक गंभीर समस्या आहे. ती थांबवण्यासाठी शासन, शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात समन्वय आणि पारदर्शकता अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजहिताच्या दृष्टीनेच निर्णय होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यातील खाजगी आणि सरकारी शिक्षण संस्थानी राज्य सरकारचे शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाचे पालन नाही केले तर अशा शिक्षण संस्था आणि चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कालच सरकार मधले काही मंत्री म्हणाले, समान नागरिक कायदा लागू करणार तसाच हा पण कायदा लागू करण्यात यावा. यासाठी माहिती अधिनियम 2005 अंतर्गत लागू करण्यात यावा. पुढील येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा विषय घेण्यात यावा. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



