“रोहितजी, थोडं सबुरीने घ्या…” – अभिजीत तांबे यांचा रोहित पवार यांना मित्रत्वाचा सल्ला

अजितदादांच्या अपघाताला देवेंद्रजींशी जोडणं हे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी – अभिजीत तांबे
अकलूज (बारामती झटका)
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे, अशा भावना अभिजीत तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं, असे तांबे यांनी म्हटलं आहे.
अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं, असे अभिजीत तांबे यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हटले आहे.

रोहितजींना मित्रत्वाचा सल्ला
रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही, असे तांबे म्हणाले.
शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.

म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे, असे अभिजीत तांबे यांनी म्हटले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



