वाहनांची अतिप्रखर हेड लाईट : रात्रीचा प्रकाश की अपघातांचा सापळा ?

बारामती झटका
रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर हेडलाईट्समुळे डोळ्यांना त्रास होतो. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना परिचित आहे. एकीकडे हेडलाईट्स रस्ता प्रकाशित करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतात, तर दुसरीकडे त्यांचा अतिप्रखर प्रकाश अपघाताचे कारण ठरू शकतो. मग प्रश्न पडतो, हे प्रखर दिवे रात्रीचा प्रकाश आहेत की अपघातांचा सापळा ? यावर विचार होणे अत्यंत गरजेचे असून कारण पावसाळा सुरू होणार आहे.
रात्रीच्या वेळी वाहन चालविताना हेडलाईट्सचा वापर आवश्यक आहे यात शंका नाही; पण जेव्हा हे दिवे अति-प्रखर असतात, तेव्हा समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर ताण पडतो. अचानक डोळ्यांना झणझणीत प्रकाशाचा मारा सहन करावा लागतो, ज्यामुळे काही सेकंदांसाठी रस्ता दिसेनासा होतो. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता खूप वाढते.
अगदी हलक्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले आणि जर अशावेळी समोरून प्रखर दिव्यांचा मारा झाला तर अपघात अटळ आहे. याशिवाय अनेक वाहनचालक हाय-बीम लाईट्सचा वापर रात्रीच्या वेळी सातत्याने करतात, ज्यामुळे समोरच्याला रस्ता नीट दिसत नाही.
हाय-बीम लाईट्सबाबत जागरूकता गरजेची
रात्रीच्या वेळी समोर वाहन आल्यास लाईट डिम करणे गरजेचे आहे पण, किती जण हे पाळतात ? आपण स्वतःच्या सोयीसाठी हाय-बीम लावतो; पण समोरच्याच्या सुरक्षेचा विचार करत नाही. हा निष्काळजीपणा अनेकदा मृत्यूचे कारण ठरतो.
प्रखर दिव्यांचा वापर काय आहे गरज ?
हेडलाईट्स रस्ता प्रकाशित करतात आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक आहेत. विशेषतः ग्रामीण भागात किवा राष्ट्रीय महामार्गावर, जिथे रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था नसते, तिथे हेडलाईट्सशिवाय वाहन चालविणे अशक्य आहे; पण गरज आहे ती योग्य वापराची.
हाय-बीम लाईट्स तेव्हाच वापराव्या, जेव्हा रस्ता पूर्णपणे मोकळा आहे आणि समोरून कोणतेही वाहन येत नाही.
लो-बीम लाईटस् बंधनकारक करावा
शहरांमध्ये किंवा जिथे रस्त्यांवर पुरेसा प्रकाश आहे, तिथे लो-बीम लाईट्सच वापरायला हव्यात; पण अनेकदा वाहनचालक या नियमांकडे दुर्लक्ष करतात. भारतात मोटार वाहन कायद्यांतर्गत हेडलाइट्सच्या वापराबाबत काही नियम स्पष्टपणे नमूद आहेत. मोटार वाहन कायदा १९८८, कलम ११२ : वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीनुसार योग्य प्रकाशाचा वापर करावा, हाय-बीम लाईट्समुळे समोरच्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे आणि संकेतांचे पालन करावे. अनेक ठिकाणी ‘हाय-बीम बंद करा’ असे सूचना फलक असतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. कलम १२१: वाहन चालवितांना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा. यात लाइट डिम करण्याचा इशारा समाविष्ट आहे. जर हाय बीम लाईट्समुळे समोरच्याला त्रास होत असेल आणि याची तक्रार झाली, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड आकारला जाऊ शकतो.
पोलीस कारवाई करू शकतात पण ?
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हाय-बीम लाईट्सचा अनावश्यक वापर केल्यास स्थानिक पोलीस कारवाई करू शकतात; पण या नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते ?, हा खरा प्रश्न आहे. अनेकदा पोलीसही या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि वाहनचालकही ‘मला काय झालं ?’ असा विचार करतात.
उपाय आणि जागरूकता :
प्रखर दिव्यांचा वापर हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही, तर सामाजिक जबाबदारीचा आणि जागरूकतेचा मुद्दा आहे. तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर तपासणी वाढवून हाय-बीम लाईट्सच्या अनावश्यक वापरांवर कारवाई करावी.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.