11 ऑगस्ट 2026 रोजी अरण येथे श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा 731 वा संजीवन समाधी सोहळा; पांडुरंगाची पालखी देणार भेट

कर्म, श्रम आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या सावता महाराजांच्या सोहळ्याला राज्यभरातील वारकऱ्यांचे आगमन
अरण (बारामती झटका)
माळी समाजाची अस्मिता आणि श्री विठ्ठलाचे लाडके भक्त श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचा 731 वा दिव्य संजीवन समाधी सोहळा यंदा मंगळवार, 11 ऑगस्ट 2026, आषाढ कृष्ण चतुर्दशी रोजी श्री तीर्थक्षेत्र अरण, ता. माळशिरस येथे भक्तिभावात साजरा होणार आहे. सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीफळहंडी उत्सव संपन्न होईल.
पांडुरंगाची पालखी अरणला
वारकरी परंपरेनुसार सर्व संतांच्या पादुका आषाढी वारीला पंढरपूरला जातात. परंतु संत सावता महाराजांच्या भक्तीच्या महतीमुळे त्यांना भेटायला स्वतः पंढरीचा पांडुरंग सालाबादप्रमाणे पालखीसह अरण येथे येतो. याच दिवशी समाधी सोहळा साजरा होतो.
कर्मयोग आणि समतेचा संदेश
संत सावता महाराजांनी आपल्या अभंगातून कर्म आणि नामस्मरण यांचा मेळ घातला.
प्रपंची असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग
सावता म्हणे कांते जपे नामावळी | हृदयकमळी पांडुरंग ||
“कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी” म्हणत त्यांनी शेतीच्या कामालाच ईश्वरसेवा मानली. जाती-भेद नाकारत ब्राह्मण महार धर्मपंथ जाती | नसे भगवंती भेदाभेद असा समतेचा संदेश दिला. हरिनाम हाच सर्वात सोपा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.

संत सावता महाराज आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्रात निपुण होते. अरण येथे पटकीची साथ आली असता त्यांनी आयुर्वेदिक काढा देऊन आणि पाणी उकळून पिण्याचा सल्ला देऊन अनेकांचे प्राण वाचवले.
संतांनी केलेले गुणगान
संत नामदेव म्हणतात –
धन्य ते अरण रत्नांचीच खाण | जन्मला निधान सावता तो ||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला | वंश उद्धरीला माळीयाचा ||
संत एकनाथ महाराजही म्हणतात –
माळीयाचे वंशी सावता जन्मला | पावन तो केला वंश ||
एका जनार्दनी सावता तो धन्य | तयाचे महिमान न कळे काही ||
या दिव्य सोहळ्याला राज्यभरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनसावताभक्त सौ. सीमा अडसूळ एकतपुरे
श्री संत शिरोमणी सावता भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



