ताज्या बातम्यासामाजिक

५ लाखाची लाच घेताना दोन पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात, पोलीस दलात खळबळ…

मंगळवेढा (बारामती झटका)

तक्रार अर्जावरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव कमी करणे व नातेवाईकांना अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाख लाचेची मागणी करून पाच लाख रुपये स्वीकारताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी शनिवारी रंगेहात पकडले आहे.

हवालदार महेश कोळी (बक्कल नंबर 905, रा. निम्बर्गी, कंदलगावरोडवर ) व पोलीस शिपाई वैभव घायाळ (बक्कल नंबर 624, रा. सूर्यवंशी किराणा दुकानाजवळ, गोपाळपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत. यातील तक्रारदाराविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता. या तक्रार अर्जाची चौकशी हवालदार कोळी व पोलीस शिपाई घायाळ यांच्याकडे होती. या तक्रार अर्जावरून भविष्यात गुन्हा दाखल होणार आहे असे सांगून या दोघा पोलिसांनी तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी व त्यांच्या इतर नातेवाईकांना अटकपूर्व जामीन आणि इतर सहकार्य करण्यासाठी दहा लाख लाचेची मागणी केली.

यावर संबंधित तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार नोंदवली. पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने पंचा समक्ष खातरजमा केली. आरोपीने तडजोडीने पहिला हप्ता म्हणून पाच लाख शनिवारी घेण्याचे मान्य केले.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार पाच लाखाची लाच देत असताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच या दोघा पोलिसांच्या घराची झडतीही घेण्यात येत आहे. मंगळवेढा पोलिसांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच घेण्यात आल्याचा हा प्रकार उघड झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडालेली आहे.

सदरची कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे खराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. उमेश पाटील पोलीस, निरीक्षक किशोर कुमार खाडे, पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील यांनी केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button