अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे शीतगृह शवपेटी लोकार्पण सोहळा

समाजातील दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांना सन्मानपूर्वक आधार देण्याच्या उदात्त हेतूने साकारलेला रोटरी क्लब ऑफ अकलूज यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मानवतावादी सेवाभावी उपक्रम…
अकलूज (बारामती झटका)
ओम साई राम स्टील अँड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शीतगृह शवपेटी (Mortuary Freezer Box) याचा लोकार्पण सोहळा सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. इनामदार सर यांच्या शुभहस्ते अश्विनी हॉस्पिटल, संग्रामनगर, अकलूज येथे संपन्न झाला.
शीतगृह शवपेटी ही वैद्यकीय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त सुविधा असून, आकस्मिक निधन झाल्यानंतर दूरवरून येणाऱ्या नातेवाईकांची प्रतीक्षा किंवा अंतिम विधीची तयारी होईपर्यंत पार्थिव देह सुरक्षित व सन्मानपूर्वक जतन करण्यासाठी ही सुविधा अत्यंत आवश्यक ठरते. अशा संवेदनशील क्षणी कुटुंबीयांना आधार देणारा हा उपक्रम समाजासाठी मोलाचा ठरणार आहे.
या सोहळ्यादरम्यान डॉ. इनामदार सर यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारच्या शीतगृह शवपेटीची समाजाला अत्यंत गरज असल्याचे नमूद केले. समाजाच्या गरजांची अचूक जाण ठेवून रोटरी क्लब ऑफ अकलूज या सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लबचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या लोकार्पण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ अकलूजचे अध्यक्ष रो. केतन बोरावके, सचिव रो. अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख रो. सीए नितीन कुदळे सर, तसेच रो. बबनराव शेंडगे, रो. आशिष गांधी, रो. ॲड. प्रवीण कारंडे, रो. कल्पेश पांढरे, रो. अजित वीर, रो. गजानन जवंजाळ सर, रो. याबाजी हे रोटरी सदस्य उपस्थित होते.
समाजसेवेची परंपरा जपत, दुःखाच्या प्रसंगी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा रोटरी क्लब ऑफ अकलूजचा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला. रोटरी क्लब ही सामाजिक संस्था असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था आहे. या संस्थेने आजपर्यंत अनेक समाजउपयोगी कामे केली आहेत. गोरगरिबांना मदत, अनेक अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा संस्थांना मदतीचा हात देवून दिलासा दिला आहे. कोरोना काळातही या संस्थेने गरजू लोकांना जीवनावश्यक कीटचे मोफत वाटप केले होते. अनेक सामाजिक उपक्रमांच्या आधारे लोकांना मदत केली जाते. रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, अशी अनेक शिबिरे या संस्थेच्या मार्फत राबविली जातात. यातून ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत आपले अनमोल कार्य करत असते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



